चाेर नव्हे, चक्क पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्याने लाचेची रक्कम घेऊन ठोकली धूम
By शिरीष शिंदे | Published: August 22, 2023 10:15 PM2023-08-22T22:15:18+5:302023-08-22T22:15:32+5:30
कीर्तने हे साधारण तीन महिन्यांपूर्वीच बीड जिल्ह्यात बदलून आले आहेत. मागील आठ दिवसांपूर्वी एका अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास कीर्तने यांच्याकडे होता.
बीड : अपहरणाच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व जप्त केलेले वाहन सोडण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच मागितली. पैकी दहा हजार रूपये घेताना पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस कर्मचाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी धूम ठोकली. त्यानंतर एसीबीच्या टीमने पाठलाग करत दोघांनाही ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाणे परिसरात करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
लक्ष्मण कनलाल कीर्तने (वय ३४) हे पीएसआय असून रणजीत भगवान पवार (वय ४२) हे हवालदार आहेत. दोघेही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. कीर्तने हे साधारण तीन महिन्यांपूर्वीच बीड जिल्ह्यात बदलून आले आहेत. मागील आठ दिवसांपूर्वी एका अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास कीर्तने यांच्याकडे होता. यात तीन आरोपी होते. या सर्वांना अटक न करण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली. कारवाई आधीच म्हणजे मंगळवारी सकाळीच त्यांनी १० हजार रूपये घेतले होते. त्यानंतर आणखी ८ हजार रूपये घेतले. पुन्हा पैशांची मागणी केल्याने एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्याप्रमाणे एसीबीने सापळा रचत या दोघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला. कीर्तने व पवार हे दोघे दुचाकीवरून आले. त्यांनी १० हजार रूपये घेत लगेच धुम ठोकली. त्यानंतर एसीबीच्या टीमने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडून लाचेची रोख १० रूपयांची रक्कमही जप्त केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पेालिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, युनूस शेख, सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, अविनाश गवळी, संतोष राठोड, भारत गारदे, अमोल खरमाडे आदींनी केली.
पोलिस ठाणे कायमच वादात
या पोलिस ठाण्यात नेहमीच पोलिस अधिकारी, कर्मचारी लाच घेताना पकडले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच बसस्थानकातील चोर पकडले. नंतर तोडपाणी करून सोडून दिल्याची चर्चा होती. ही चर्चा थांबत नाही तोच पीएसआय आणि कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले. त्यामुळे हे पोलिस ठाणे कायमच वादात राहत आहे.