बीडमध्ये एसीबीची हलगर्जी; आरोपीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:33 AM2018-05-21T00:33:42+5:302018-05-21T00:33:42+5:30

अवघ्या काही तासातच छत्रभूज थोरात (३४, रा. चिंचपूर, ता. धारुर) या झिरो पोलिसाने लघुशंकेचा बहाणा करीत पलायन केले.

ACB's helicopter in Beed; Escape of the accused | बीडमध्ये एसीबीची हलगर्जी; आरोपीचे पलायन

बीडमध्ये एसीबीची हलगर्जी; आरोपीचे पलायन

googlenewsNext
ठळक मुद्देलघुशंकेच्या बहाण्याने संरक्षण भिंतीवरुन मारली उडी

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ४० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोन पोलीस अधिकारी, दोन झीरो पोलीस व एक हेडकॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. पैकी एक झिरो पोलीस, एक अधिकारी व एक हवालदारास तात्काळ बेड्या ठोकल्या होत्या. या तिघांना एसीबीने बीडच्या कार्यालयात आणले. परंतु अवघ्या काही तासातच छत्रभूज थोरात (३४, रा. चिंचपूर, ता. धारुर) या झिरो पोलिसाने लघुशंकेचा बहाणा करीत पलायन केले. ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वा. घडली. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपीने पलायन केल्याने खळबळ उडाली आहे

खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी चिंचपूर येथील एका व्यक्तीकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक फौजदार अमिरोद्दीन इनामदार, पो.हे.काँ. दत्तात्रय बिक्कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश केळे या पोलिसांसह छत्रभूज थोरात व अशोक हंडीबाग या दोन झिरो पोलिसांना पकडले होते.

यापैकी हंडीबाग व केळे दोघे घटनास्थळावरुन फरार झाले होते. कारवाईनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यातील तिघांनाही बीडच्या एसीबी कार्यालयात आणले. कार्यालयात येताच त्यांची चौकशी सुरु केली. याचवेळी छत्रभूज थोरात याने लघुशंकेचा बहाणा करीत संधी साधली. एसीबीचे अधिकारी तसेच कर्मचारी चौकशी व इतर कारवाईत व्यस्त असल्याचे पाहून थोरातने कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवरुन अलगद उडी मारुन पलायन केले. हा प्रकार काही वेळाने लक्षात आला. त्यानंतर त्याच्या शोधासाठी एसीबीच्या अधिकारी व कर्मचा-यांची धावपळ सुरु झाली. सुरुवातीला शौचालय व कार्यालय आवारात शोध घेण्यात आला. परंतू तो मिळून आला नाही. अखेर एसीबीचे पो. ना. कल्याण राठोड यांच्या फिर्यादीवरुन शहर ठाण्यात छत्रभूत थोरातविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्यालयातून पोलीस येण्यास उशीर
एसीबीच्या अधिकाºयांनी कारवाईसाठी मुख्यालयातून बंदोबस्त मागविला होता. मात्र, येथूनच पोलीस कर्मचा-यांना येण्यास उशीर लागला. दुसरीकडे एसीबीचे अधिकारी व कर्मचारी कारवाईत व्यस्त होते. हीच संधी साधून आरोपीने पलायन केले. आता यात नेमके दोषी कोण ? हे चौकशीनंतर समोर येणार आहे.

विश्वास ठेवणे अंगलट
एसीबीत येणारे आरोपी कुख्यात किंवा अट्टल नसतात. त्यांना पोलीस ठाण्यांप्रमाणे येथे तशी वागणूक दिली जात नाही. येथे सर्व विश्वासाचा खेळ चालतो. याच विश्वासाचा फायदा घेऊन छत्रभूत थोरातने पलायन केले अन् ते एसीबीच्या अंगलट आले. आतापर्यंत एसीबीच्या ताब्यातून आरोपीने पलायन करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

चौकशी केली जाईल
ताब्यातील दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पलायन केलेल्या व फरार आरोपींचा शोध सुरु आहे. लवकरच त्यांना अटक करु. आरोपी पलायन प्रकरणात दोषी कोण याची चौकशी केली जाईल.
- बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड

Web Title: ACB's helicopter in Beed; Escape of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.