बीड जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:44+5:302021-06-11T04:23:44+5:30

बीड : खरीप हंगामात बीड जिल्ह्यात पीककर्ज वाटपात मागील वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी गती आली आहे. ७ जूनपर्यंत ...

Accelerate crop loan disbursement in Beed district | बीड जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाला गती

बीड जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाला गती

Next

बीड : खरीप हंगामात बीड जिल्ह्यात पीककर्ज वाटपात मागील वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी गती आली आहे. ७ जूनपर्यंत ११ हजार ५३० शेतकऱ्यांना ९५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण ५.९१ टक्के इतके आहे. गतवर्षी १ एप्रिल ते १५ जूनपर्यंत पीक कर्ज वाटपाचे प्रमाण आठ टक्के होते.

खरीप हंगाम २०२१-२२ साठी बीड जिल्ह्याला १६०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. एक एप्रिलपासून पीक कर्ज वाटपाला जिल्ह्यातील बँकांनी सुरुवात केली. पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी वेळोवेळी पाठपुरावा सुरू ठेवला आहे तर अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीधर कदम यांनी जिल्ह्यातील बँकांशी समन्वय राखत पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुलभ व गतिमान करण्यासाठी सातत्याने संपर्क ठेवला आहे.

चालू आर्थिक वर्षात १ ते ३० एप्रिलपर्यंत ८५१ शेतकऱ्यांना १८ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. एप्रिल आणि मेमध्ये ४ हजार ५८२ शेतकऱ्यांची प्रकरणे मंजूर तसेच कर्ज वाटप झाले. त्यानंतर मात्र जूनमध्ये या प्रक्रियेला वेग आला ७ जूनपर्यंत ११ हजार ५३० शेतकऱ्यांना ९५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने ४ हजार ९२० शेतकऱ्यांना ४५ कोटी ६१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ॲक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय, कोटक महिंद्रा, आरबीएल बँकेच्यावतीने ३९२ शेतकऱ्यांना ९ कोटी ७३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने २१९२ शेतकऱ्यांना १६ कोटी ५० लाख रुपयांचे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४ हजार २६ शेतकऱ्यांना २२ कोटी ७३ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

मागील वर्षी १५ जूनपर्यंत ११ हजार ७०४ शेतकऱ्यांना ८८ कोटी १२ लाखांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. त्यावेळी खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे उद्दिष्ट ९५० कोटी रुपयांचे होते. यावर्षी १६०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट असल्याने व ते शंभर टक्के साध्य करण्यासाठी शासन, प्रशासन व बँक पातळीवर प्रयत्न होत आहेत.

Web Title: Accelerate crop loan disbursement in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.