मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:53+5:302021-05-07T04:35:53+5:30
बीड : रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा यासह इतर पिके निघाली आहेत. तसेच जवळपास जिल्ह्यातील सर्व ठिकाणची पिके ...
बीड : रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा यासह इतर पिके निघाली आहेत. तसेच जवळपास जिल्ह्यातील सर्व ठिकाणची पिके निघाली आहेत. शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीत आहेत. तसेच खरिपातील मशागतीच्या कामाला वेग देत असून, अनेक शेतकरी कुटुंब या कामात व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
झाडांचे संगोपन करण्याचे आवाहन
बीड : मागील काही वर्षात वृक्षारोपणानंतर यंदा पाऊस चांगला असल्यामुळे झाडे जोमात आलेली आहेत. मात्र काही लोकांकडून फांद्या तोडल्या जात आहेत, तर काही ठिकाणी झाडांची पाने मोकाट जनावरे खात आहेत. लॉकडाऊनमुळे झाडांच्या संगोपनाकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले असून, निसर्गप्रेमींनी आपल्या परिसरातील झाडांची काळजी घेण्याचे आवाहन जागर युवा संस्थेने केले आहे.
बँकेत ग्राहकांची गर्दीच गर्दी
अंबाजोगाई : शहरात बँकेची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रीयीकृत बँका, नागरी बँका, पतसंस्था, मल्टिस्टेट, या सर्वच ठिकाणी ग्राहक गर्दी करू लागले आहेत. अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. अशी स्थिती असतानाही मास्कचा वापर न करणे. सामाजिक अंतर न पाळणे, या नियमांचे सातत्याने उल्लंघन होत आहे. ग्राहकांकडून होणाऱ्या या दुर्लक्षाकडे बँक प्रशासनाने खबरदारी पाळण्याचे आवाहन करावे.
रेंज मिळत नसल्याने मोबाइलधारक हैराण
बीड : बीड शहर व परिसरातील ग्रामीण भागात बीएसएनएलची मोबाइल सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. समोरच्या व्यक्तीला फोन लावला तरी रेंज उपलब्ध नसते. जर रेंज उपलब्ध असेल तर ती व्यक्ती आउट ऑफ कव्हरेज एरिया असे सांगितले जाते. अशी स्थिती इंटरनेट कनेक्शनबाबतीतही झाली आहे. सोशल मीडियाचा वापर करताना मोबाइलमध्ये रेंज दिसते. मात्र, कामकाज होत नाही. अशा स्थितीमुळे मोबाइलधारक हैराण झाले आहेत.
नेकनूर परिसरातील नद्यातून वाळू उपसा
बीड : तालु्क्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने वाळूचा उपसा करून टिपरने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे. याकडे संबंधित महसूल विभाग व नेकनूर पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने शासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा वाळूचा उपसा बंद करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.