परळी रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाला गती; दुहेरीकरण व यार्डाच्या कामांची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 03:04 PM2024-10-09T15:04:27+5:302024-10-09T15:04:57+5:30

विभागीय रेल्वे व्यवस्थापक भरतेशकुमार जैन यांनी परळी रेल्वे स्टेशनची पाहणी करून विकासकामांची तपासणी केली.

Accelerating Parali Railway Station Renovation; The process of doubling and yard works is in progress | परळी रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाला गती; दुहेरीकरण व यार्डाच्या कामांची प्रक्रिया सुरू

परळी रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाला गती; दुहेरीकरण व यार्डाच्या कामांची प्रक्रिया सुरू

परळी: परळी येथील रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाचे काम सध्या जोरात सुरू असून, स्टेशनच्या विकासकामांसाठी आणखी निधी उपलब्ध होणार आहे. तसेच, परळी-परभणी रेल्वे मार्गावरील दुहेरीकरण व रेल्वे यार्डाचे काम देखील करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक भरतेशकुमार जैन यांनी दिली.

बुधवारी सकाळी ९ वाजता विभागीय रेल्वे व्यवस्थापक भरतेशकुमार जैन यांनी परळी रेल्वे स्टेशनची पाहणी करून विकासकामांची तपासणी केली. त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेची खात्री करून घेतली आणि स्टेशनमध्ये चालू असलेल्या बांधकामाचे बारकाईने निरीक्षण केले. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य रेल्वेच्या परळी-परभणी मार्गावरील दुहेरीकरण आणि रेल्वे यार्डाच्या कामासाठी परळी परिसरातील जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया काहीशी वेळ घेईल, परंतु हे काम निश्चितपणे पूर्ण होईल. तसेच, स्टेशनच्या विकासकामांना गती मिळण्यासाठी आणखी निधी उपलब्ध होईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

या दौऱ्यात रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. संघटनेचे अध्यक्ष जी.एस. सौंदळे, प्रासत्यनारायण दुबे, विजया दहिवाळ, कैलास तांदळे, सोमनाथ निलंगे, सुधीर फुलारी, मकरंद नरवणे, राजेश कांकरिया, रमणीक पटेल, शिरीष सलगरे, हिरालाल बोरा, अनिल मिसाळ यांची उपस्थिती होती. याशिवाय, अश्विन मोगरकर व प्रा. प्रवीण फुटके यांनीही रेल्वे कामांबाबत चर्चा केली. यादरम्यान, आर.पी.एफ. पोलीस निरीक्षक प्रल्हाद मीना, पोलीस उपनिरीक्षक किशोर मलकुनाईक, तिकीट तपासणी अधिकारी राजेश आणि किशोर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रवासी संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्या:
- नांदेड-पनवेल रेल्वेगाडीच्या बोगी वाढवणे
- मछलीपट्टणम-बीदर, सिकंदराबाद-बीदर इंटरसिटी, यशवंतपूर-बीदर एक्सप्रेस, पाटणा-पूर्णा, रायचूर-परभणी गाड्या परळी-वैजनाथपर्यंत विस्तारित कराव्यात  
- दिवाळी सणानिमित्त विशेष रेल्वे सुरू करणे
- पूर्णा-परळी रेल्वे लातूर-धाराशिव किंवा उदगीर-बीदरपर्यंत विस्तारित करावी  
- अमरावती-पुणे व कोल्हापूर-नागपूर रेल्वे दररोज सुरू करावी
- घाटनांदूर, वडगाव (निळा) येथे विनाकारण होणारे रेल्वे थांबे टाळावेत  
- परळी रेल्वे स्टेशनमधील आरक्षणाची वेळ वाढवावी

Web Title: Accelerating Parali Railway Station Renovation; The process of doubling and yard works is in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.