अपघातवार ! बीड जिल्ह्यात चार अपघातात पाच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 08:30 PM2018-07-13T20:30:53+5:302018-07-13T20:33:32+5:30
जिल्ह्यात आज चार वेगवेगळ्या अपघातांत पाच जण ठार झाले़. आडस- अंबाजोगाई रस्त्यावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला.़ वडवणी तालुक्यात टिप्परच्या धडकेत बियाणे खरेदीसाठी निघालेले दुचाकीवरील दोन शेतकरी ठार झाले़
बीड : जिल्ह्यात आज चार वेगवेगळ्या अपघातांत पाच जण ठार झाले़. आडस- अंबाजोगाई रस्त्यावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला.़ वडवणी तालुक्यात टिप्परच्या धडकेत बियाणे खरेदीसाठी निघालेले दुचाकीवरील दोन शेतकरी ठार झाले़ गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला़ तर लोखंडीसावरगावजवळ दुचाकी घसरून पडल्याने एक जण जागीच ठार झाला. यामुळे जिल्ह्यात शुक्रवार अपघातवार ठरला.
अमेर अन्वर शेख (३०, रा. भालदारपुरा बीड) हे दुचाकीवरुन (क्ऱएमएच २३ एके- ७९७६) पत्नी व भावाच्या अडीच वर्षांच्या मुलासमवेत बीडहून अंबडकडे जात होते. पाडळसिंगीजवळ समोरुन आलेल्या भरधाव ट्रकने (जीजे०१ सीझेड- ५६०१) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे आमेर व दुचाकीवरी पत्नी व पुतण्या रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यात जखमी होऊन आमेर यांचा मृत्यू झाला तर पत्नी व पुतण्या गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, दुचाकीला धडक दिल्यानंतर लगेच ट्रकने दुचाकीमागे असलेल्या कारलाही (क्ऱएमएच ०३ बीसी- ०७८२) समोरुन धडक दिली़ कारमधील शेख युसूफ शेख युनूस, सय्यद मंजूर मनोद्दीनजमीर, शेख जमीर शेख बाबमियां, शेख सादेक सिकंदर (सर्व रा. मासूम कॉलनी बीड ) हे जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुपारनंतर काही गंभीर रुग्णांना औरंगाबाद येथे हलिवण्यात आले आहे. अपघातानंतर गेवराई ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली़ तोपर्यंत नागरिकांनी ट्रकचालक प्रताप ठाकूर याला पकडले़ त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले़ अपघाताची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात जखमी व मृताच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती.
दुसऱ्या घटनेत ताडसोन्ना येथून वडवणीकडे निघालेल्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या टिप्परने जोराची धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील केशव लंबाटे (४५), कुंडलीक मुंडे (३५ दोघे रा. ताडसोन्ना) हे दोन शेतकरी जागीच ठार झाले. शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घाटसावळी जवळील पोखरी फाट्यावर ही घटना घडली. ते पेरणीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी मित्राची दुचाकी (क्र.एमएच २३ एम-५१४१) घेऊन वडवणीला निघाले होते. मात्र पोखरी फाट्यावर टिप्परने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातानंतर टिप्परसह चालक फरार झाला असून पिंपळनेर पोलीस त्याचा शोध घेत आहेत़
आडस येथील किराणा मालाचे व्यापारी विष्णू सदाशिव कोटे हे अंबाजोगाई येथून दुचाकीवरुन (एमएच ४४ एल- २३८२) आडस येथे येत होते. आडस येथून अंबाजोगाईकडे जाणारी कार (क्र. एमएच २४ एल -००१७) या दोन्ही वाहनांची केंद्रेवाडी शिवारात समोरासमोर धडक झाली. कारच्या खाली अडकून दुचाकी ५० फूट फरफटत गेली़ यामध्ये विष्णू कोटे यांना गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. कारमधील दोघे जखमी असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गाडीवरून पडून एकाचा मृत्यू
मध्यरात्रीच्या वेळी लोखंडी सावरगावहून सोमनाथ बोरगावकडे निघालेल्या उमेश बबन सोमवंशी (वय ३२, रा. सोमनाथ बोरगाव, ता. अंबाजोगाई) यांचा मोटारसायकल घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना अंकुर प्रतिष्ठानजवळ घडली. पावसामुळे ओलसर झालेल्या रस्त्यावरून त्यांची दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला पडल्याने पहाटेपर्यंत त्यांच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. पहाटेच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना पाहिले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आला.