धारुर घाटात अपघात; एकजण जागीच ठार, एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 01:44 PM2021-03-12T13:44:54+5:302021-03-12T13:52:32+5:30
राष्ट्रीय महामार्ग 548-सी या महामार्गावर अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
धारूर : तालुक्यात अपघाताची मालिका सुरुच असून शुक्रवारी ( दि.12 ) पहाटे आरणवाडी जवळील घाटात कार व दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर तिघे जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 548-सी या महामार्गावर अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
औरंगाबाद येथून लातूरकडे जात असताना एक कार ( एमएच 20 एफ पी 4132 ) तेलगावकडे जाणार्या मोटर सायकलला धडकली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. मृताचे नाव शैलेश पवार (रा.औरंगाबाद) असल्याची माहिती आहे. जखमींना किल्ले धारूर ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यात एक वर्षाच्या रुद्र या बालकासह प्रवीण कातळे, महारुद्र कातळे या दोघांचा समावेश होता. यातील प्रवीण यास गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला हलवण्यात आले आहे.
काल तेलगाव येथे बीड-परळी रस्त्यावर एका महिलेस ट्रकने चिरडल्याची घटना घडली होती. तर अंबेवडगाव येथे दि.4 मार्च रोजी पहाटे कार व ट्रॅक्टरचा अपघात होवून एक तरुण ठार झाल्याची घटना घडली होती. राष्ट्रीय महामार्ग 548-सी वर वाढती वाहतूक व घाटातील अवघड वळणे अपघाताचे कारण ठरत आहेत. येथील घाट रुंदीकरणाचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने घाटात तासनतास वाहतूक खोळंबत असल्याचे दिसत आहे.