बाप-लेकाचे अपहरण करून निघालेल्या जीपला अपघात; ९ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 07:12 PM2018-05-25T19:12:51+5:302018-05-25T19:12:51+5:30
चार एकर जमीनीचे खरेदी खत करून घेण्यासाठी जबरदस्तीने बाप-लेकाला घेऊन निघालेल्या अपहरणकर्त्यांच्या जीपला केज तालुक्यातील होळनजीक अपघात झाला.
अंबाजोगाई (बीड ) : चार एकर जमीनीचे खरेदी खत करून घेण्यासाठी जबरदस्तीने बाप-लेकाला घेऊन निघालेल्या अपहरणकर्त्यांच्या जीपला केज तालुक्यातील होळनजीक अपघात झाला. या अपघातात अपह्रत बाप-लेक आणि ७ अपहरणकर्ते जखमी झाले आहेत. हि घटना दि. २३ मी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
याप्रकरणी लघुपाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेले कारकून राजाभाऊ नारायण पिंपरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्या नुसार त्यांच्या केज तालुक्यातील लहुरी येथील गट क्र. १४१ मधील चार एकर जमिनीचा व्यवहार होळ येथील सोनेराव रामराव घुगे याच्यासोबत ठरला होता. घागे यास शेळीपालनासाठी हि जागा पाहिजे होती. दि. ६ फेब्रुवारी २०१६ रोजी या जागेची ६० हजार रुपयांची इसारपावती देखील घुगे याने करून घेतली होती. मात्र, पिंपरकर यांच्या परस्पर घुगे याने ६ लाख रुपयात सदरील जागा खरेदी केल्याचा डाव न्यायालयात दाखल केला होता.
आजही हे प्रकरण न्यायालयात सुरु आहे. दि. २३ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास राजाभाऊ पिंपरकर हे कुटुंबीयांसह त्यांच्या विद्याकुंज कॉलनी येथील घरी बसले होते. यावेळी अचानकच एका जीपमधून (एमएच ४२ - ७०८३) आलेले सोनेराव घुगे आणि अन्य सहा जण पिंपरकर यांच्या घरात घुसले. त्यांनी राजाभाऊ आणि त्यांचा मुलगा महेश यास जीपमध्ये घातले आणि बीड रोडने निघाले. गाडीत असताना घुगे याने ‘चार एकरचे खरेदीखत करून दे अन्यथा खल्लास करून टाकूत’ अशी धमकी दिली आणि बाप-लेकांना मारहाण केली. मात्र, सदरील जीप होळजवळच्या पुलावर आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली आणि जीपमधील सर्वच्या सर्व ९ जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी राजाभाऊ पिंपरकर यांच्या फिर्यादीवरून सोनेराव रामराव घुगे (रा. होळ), हनुमंत बबन बिलपे, नारायण मधुकर वरकले (दोघेही रा. पहाडी पारगाव), धम्मानंद मीटटु मस्के, रवि अभिमान मस्के (दोघेही रा. पहाडी दहीफळ), व्यंकट (रा. चोरंबा) आणि एका अनोळखी व्यक्तीवर कलम ३६५,३२३, ४५२, १४३, १४७, १४९, २७९, ३३७, ३३८, ५०४, ५०६ अन्वये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास जमादार सोळंके करत आहेत.