मुलीच्या वाढदिवसाला जाणाऱ्या धारूरच्या पोलीस निरीक्षकाचा कार अपघातात पत्नीसह मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 04:23 PM2019-02-27T16:23:16+5:302019-02-27T16:24:39+5:30
पोलीस निरीक्षक जाधव यांचा पुण्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
बीड : पुण्यात राहणाऱ्या मुलीचा बुधवारी वाढदिवस होता. तिला शुभेच्छा देण्यासाठी धारूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव हे पत्नी सुजाता (४० रा.सांगली ) यांच्यासह जात होते. नगर-पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. यामध्ये जाधव यांची पत्नी जागीच ठार झाली. तर गंभीर जखमी असलेल्या जाधव यांचा सायंकाळी पुण्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
अनिलकुमार जाधव हे सध्या धारूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांची ऐश्वर्या नावाची मुलगी पुण्यात युपीएससीची तयारी करीत आहे. तसेच एका शाळेवर शिक्षिकाही आहेत. ऐश्वर्याचा आज वाढदिवस होता. तिला शुभेच्छा देण्यासाठी जाधव हे पत्नी सुजाता यांच्यासह कारने (एमएच १० - ८८८९) पुण्याला जात होते. नगर-पुणे महामार्गावर बेलखंडी पोलीस ठाणे हद्दीत गव्हाणवाडी जवळ त्यांच्या कारला अपघात झाला. उभा असलेल्या कंटेनरला कार धडकून रस्त्याच्या खाली गेल्याने हा अपघात झाल्याचे शिरूर पोलिसांकडून सांगण्यात आले. जाधव हे स्वत: कार चालवित होते तर पत्नी या बाजूला बसलेल्या होत्या. कार डाव्या बाजुला पलटल्याने त्यामध्ये अडकल्या.
हा अपघात झाल्याची माहिती समजताच बाजूच्या लोकांनी धाव घेत दोघांनाही जवळच्या रूग्णालयात दाखल केले. उपचारासाठी नेत असतानाच सुजाता जाधव यांची प्राणज्योत मालवली. तर अनिलकुमार जाधव यांचा पुण्यातील खराडी येथील खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.