आष्टी येथे पोलीस जीप आणि कारच्या धडकेत एकजण जागीच ठार; आठ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:01 PM2019-05-14T13:01:43+5:302019-05-14T13:04:13+5:30
पहाटे झालेल्या घटनेत दोन्ही गाडीतील आठजण जखमी झाले आहेत
आष्टी (बीड ) : आष्टी पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किमी अंतरावर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांची जीप आणि एका कारची समोरासमोर धडक झाली. यात एकजण जागीच ठार झाले तर आठजण जखमी झाले आहेत. बाळासाहेब दादाराव देवगडे ( ४५ ) असे मृताचे नाव असून जखमींवर आष्टी आणि नगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
केज तालुक्यातील लव्हरी गावातील देवगडे हे सध्या डोंबिवली येथे राहतात. सोमवारी रात्री डोंबिवलीवरून आपल्या मूळ गावी लहूरी (ता केज ) येथे नातेवाईकांसोबत कारने (MH0१-BK९२४९) जात होते. आज पहाटे आष्टी पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किमी अंतरावर पोलीस जीप ( MH २३ F १११७ ) आणि त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाली. यात कारमधील बाळासाहेब दादाराव देवगडे हे जागीच ठार झाले. तर किशोर बाळासाहेब देवगडे ( २३ ) वसंत डागे (२५, रा कोल्हेवाडी ता केज ), सुमन वसंत डांगे (२३,रा. कोल्हेवाडी ता केज), सोनाली देवगडे ( २०,रा लाहूरी ता केज) यांच्यासह आर्यन आणि आराध्या ही दोन चिमुकली जखमी झाली. त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
तसेच पोलिस जीपमधील चालक हनुमंत बागर, विठ्ठल नरवडे हे दोघे जखमी असून त्यांच्यावर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक डॉ. विशाल शहाने, पोह गणेश भोसले, पोका सचिन कोळेकर, पोह नवनाथ काळे, पोना पाडूरग दराडे, पोका अनिल राऊत यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.