ओव्हरटेक करताना मिनीबसला अपघात; देवदर्शनासाठी जाणारे जळगावचे आठ भाविक जखमी
By सोमनाथ खताळ | Published: July 29, 2023 06:21 PM2023-07-29T18:21:18+5:302023-07-29T18:21:47+5:30
रापमच्या बसला पाठीमागून दिली धडक; चालकाच्या अतिघाईमुळे अपघात
बीड : जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून, शनिवारी पुन्हा एक अपघात झाला. पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मिनीबसने ओव्हरटेक करताना रापमच्या बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात चार गंभीर, तर चार किरकोळ जखमी झाले. हा अपघात बीड तालुक्यातील रौळसगावजवळ शनिवारी सकाळी झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व जखमी भाविक हे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी आहेत.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील कोळी कुटुंब व त्यांचे नातेवाईक पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. त्यांच्या मिनीबसमध्ये (एमएच १९ वाय ६१०२) जवळपास १७ प्रवासी होते. याच मिनीबसने सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील रौळसगावजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला (एमएच १४ डीटी १९२९) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पाठीमागून धडक दिल्याने मिनीबस रस्त्याच्या खाली गेली. तसेच समोरील भागही चेपला गेला. यात बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघात होताच रापमची बस बाजूला जाऊन थांबली, तर परिसरातील लोकांनी लगेच धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच महामार्ग पोलिस, नेकनूर पोलिस आणि रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचली. त्यांनी जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविले. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असून, चौघांची स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, अपघातानंतर उपनिरीक्षक यशवंत घोडके, संजय खताळ, अनिल तांदळे, विलास ठोंबरे, सांगळे, जालिंदर सुरवसे, पह्राट यांच्यासह नेकनूर पोलिसांनी जखमींना मदत केली. तसेच वाहतूकही सुरळीत केली.
अशी आहेत जखमींची नावे
नर्मदा एकनाथ कोळी (वय ६०), कैलास बोधवडे (चालक), अश्विनी सपकाळे (वय २५), राजर्षी कोळी (१६) हे गंभीर जखमी आहेत, तर आशा कोळी (५०), सुरेखा कोळी (४०), मनीषा कोळी (४०), राहुल कोळी (३२) हे किरकोळ जखमी आहेत. हे सर्व जखमी भाविक जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या बीड व परिसरातील नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.