आई-वडिलांना भेटण्यास जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:44 PM2019-06-29T13:44:35+5:302019-06-29T13:45:37+5:30
धानोरा गावाजवळील वळणावर त्याचा गाडीवरून ताबा सुटला.
कडा (बीड ) : पाच महिन्यानंतर पुण्यावरून नांदेड येथे आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी जाणाऱ्या एका युवकाचा धानोरा गावाजवळील वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघाती मृत्यू झाला. अविनाश देवराव दांगट (१९ ) असे मृत युवकाचे नाव असून शुक्रवारी (दि. २८ ) रात्री ९ वाजे दरम्यान हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अविनाश दांगट हा मागील ५ महिन्यांपासून पुणे येथील मोसी येथे एका बेकरीत पाच महिन्यांपासून काम करत असे. शुक्रवारी तो दुचाकीवरून (MH 14 FH 9334 ) नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उमरी येथे रहिवासी असलेल्या आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी जात होता. प्रवासादरम्यान धानोरा गावाजवळील वळणावर त्याचा गाडीवरून ताबा सुटला.यात गंभीर जखमी झालेल्या अविनाशचा जागीच मृत्यू झाला.
संरक्षक भिंत नसल्याने अपघात
याच वळणावर मागील वर्षी बीड येथील एका लक्झरीचा अपघात झाला होता यात अकरा लोकांचा बळी गेला होता. तेव्हापासून येथे संरक्षण भिंत उभारावी अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने कसलीच व्यवस्था केली नसल्याने पुन्हा एकदा त्या वळणाने एका युवकाचा बळी घेतला आहे. आता तरी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांनी केली आहे.