घटनस्थापनेच्या पूर्वसंध्येेला दुर्घटना; दोन भावंडांसह रिक्षाचालक, महिला बुडाले
By सोमनाथ खताळ | Published: October 14, 2023 08:50 PM2023-10-14T20:50:54+5:302023-10-14T20:51:16+5:30
केज, शिरूर तालुक्यातील घटना : धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर घडली घटना
केज : पालकांसोबत दसऱ्याचे धुणे धुवायला गेलेल्या दोन बालकांसह, त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या टमटम चालकाचा खदानीत बुडून मृत्यू झाला. ही घटना केजच्या पश्चिमेस असलेल्या काझी तलाजवळ घडली. तर शिरूर तालुक्यातीलही एक महिला दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गेली असता तलावात पडली. घटना घटस्थापणेच्या पुर्वसंध्येलाच या दुर्दैवी घटना घडल्या आहेत.
केज शहरातील गणेश नगर भागातील गजानन वाघमारे हे पत्नी आशाबाई, मुलगा सोमेश्वर, रोहित आणि वैष्णवी या तीन मुलांना सोबत घेऊन कपडे धुण्यासाठी बीड महामार्गालगत असलेल्या खदाणीवर गेले होते. जाण्यासाठी त्यांनी अविनाश संतोष घोडके यांचा रिक्षा किरायाने घेतला होता. कपडे धुतल्यानंतर ते वाळत आसताना सायंकाळ चार वाजेच्या सुमारास आशाबाई या अंघोळ करत होत्या. तर काही अंतरावर वैष्णवी (वय १२) व सोमेश्वर (वय १५) हे दोघे पण अंघोळ करत होते. याचवेळी वैष्णवीचा पाय घसरून ती पाण्यात बुडुन लागली. तीला वाचविण्यासाठी सोमेश्वर पाण्यात उतरला. हे दोघेही बुडाल्याचे पाहुन आई आशाबाई, लहान भाऊ रोहीत हे पण पाण्यात उतरले. ते दोघेपण पाण्यात बुडत आसल्याचे रिक्षाचालक अविनाश घोडके (वय १८) याने पाहीले. त्याने तात्काळ पाण्यात उडी मारून आशाबाई व रोहित (वय ११) यांना बाहेर काढले. वैष्णवी व सोमेश्वरला बाहेर काढण्यासाठी पुन्हा पाण्यात उतरल्यावर अविनाश देखील बुडाला. या घटनेत तिघांचा बुडून मृत्यू झाला तर दोघे वाचले. याची माहीती मीळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, जमादार श्रीकांत चौधरी, त्र्यंबक सोपणे आणि बाळासाहेब अहंकारे यांनी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर तिघांचेही मृतदेह केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले.
वडील गजानन गेला पुडी खायला !
गजानन वाघमारे हे धुणे धुवायचे झाल्यानंतर ते वाळत आसताना त्याला पुडी खाण्याची तलफ झाली. म्हणुन ते बीड महामार्गावरील पान टपरीवर गेले. तीकडेच मराठा आरक्षणाच्या सभेवरुन परत येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी चहा, नाष्टा व पिण्याच्या पाण्याची सोय केलेल्या ठीकाणी गेले. तोपर्यंत इकडे त्यांची मुले बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली.
धुणे धुण्यासाठी गेलेली महिला तलावात बुडाली
पाटोदा : शिरुर तालुक्यातील टाकळवाडी येथील भामाबाई सुभाष वीर (४०, रा. टाकळवाडी, ता. शिरुर) ही महिला धुणे धुण्यासाठी तलावावर गेली असता पाय घसरून पडली. त्यात त्यांचा मृृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रायमोह ग्रामपंचायतचे बाबू व्यवहारे, बंडू वीर यांनी मृतदेह तलावातून बाहेर काढला.