जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यासह लेखापालास लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:34 AM2021-04-01T04:34:11+5:302021-04-01T04:34:11+5:30
माजलगाव : रस्त्याच्या झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागातील उपअभियंता ...
माजलगाव : रस्त्याच्या झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागातील उपअभियंता हिरामण गालफाडे व लेखापाल रमेश मिठेवाड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
माजलगाव येथील पंचायत समितीच्या आवारात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत मतदार संघातील हिंगणी या गावातील रस्त्याचे व नालीचे बांधकामाचे पूर्ण झाले होते. मात्र याचे बिल देण्यासाठी संबंधित ठेकेदाराला उपअभियंता गालफाडे हे बारा हजार रुपये टक्केवारी मागत होते. परंतु काम केले असल्याने टक्केवारी देण्यास ठेकेदाराने असमर्थता दाखवत सहा हजार रुपये देतो असे म्हणून तडजोड केली. त्यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ठेकेदाराने तक्रार दाखल केली. त्यानुसार बुधवारी दुपारी पंचायत समिती आवारातील जिल्हा परिषद बांधकाम विभागात सापळा रचण्यात आला. यावेळी लेखापाल मिठेवाड व गालफाडे यांना सहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सखाराम घोलप, अमोल बागलाने, विजय बरकसे यांनी केली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
घराची झडती
या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेण्यात येत आहे. दरम्यान याच कार्यालयाचा उपअभियंता अजय बहीर यास तीन महिन्यांपूर्वी १० हजाराची लाच घेताना पकडले होते. या रिक्त जागेचा पदभार गालफाडे यांना देण्यात आला होता व तेही जाळ्यात अडकले. तर एक महिन्यापूर्वी माजलगाव येथे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना ६५ हजार रूपयांची लाच घेतांना चालकासह पकडले होते.