बहुचर्चित रेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपीची मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:23 AM2021-07-20T04:23:17+5:302021-07-20T04:23:17+5:30

उच्च नायालयाने खटला केला रद्दबातल बसमधील बेवारस पार्सलमुळे वाहकाच्या कुटुंबाला अपंगत्व अंबाजोगाई : रेडिओद्वारे स्फोट घडवल्याच्या प्रकरणात आबा ...

Accused acquitted in much-discussed radio blast case | बहुचर्चित रेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपीची मुक्तता

बहुचर्चित रेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपीची मुक्तता

Next

उच्च नायालयाने खटला केला रद्दबातल

बसमधील बेवारस पार्सलमुळे वाहकाच्या कुटुंबाला अपंगत्व

अंबाजोगाई : रेडिओद्वारे स्फोट घडवल्याच्या प्रकरणात आबा ऊर्फ मुंजाबा राजाभाऊ गिरी (रा. केंद्रेवाडी, ता. अंबाजोगाई) यास दोषी ठरवून अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, आरोपीविरोधात कुठलाही सबळ पुरावा नसल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा खटला रद्दबातल ठरवत आबा ऊर्फ मुंजाबा गिरी याची निर्दोष मुक्तता केली आहे.

काय आहे प्रकरण?

केंद्रेवाडी येथील आबा ऊर्फ मुंजाबा राजाभाऊ गिरी यांचे गावातीलच गोपीनाथ तरकसेसोबत शेतीवरून भांडण सुरू होते. त्यामुळे तरकसे यांचा काटा काढण्याच्या उद्देशाने आबा गिरीने नांदूरघाट येथील दत्ता जाधव यांच्याकडून जिलेटिन कांड्या घेऊन रेडिओ स्फोटाचा कट रचला. मात्र, यात रेडिओचे पार्सल बसमध्येच राहिले अन् याचा मोह बसच्या वाहकाला आवरता आला नाही. तो रेडिओ घरी घेऊन गेला आणि स्फोटात त्याचे कुटुंब जखमी झाले. ३० नोव्हेंबर २०१२ रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी या स्फोटाचा तपास पूर्ण करून आबा गिरीविरुद्ध न्यायालयात ११ जानेवारी २०१४ रोजी दोषारोपपत्र सादर केले. अंबाजोगाई येथे अपर सत्र न्या. आर. ए. गायकवाड यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे चोवीस साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आबा ऊर्फ मुंजाबा राजाभाऊ गिरी यास शिक्षा सुनावली होती. स्फोटासाठी लागणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या पुरवल्याचा आरोप असणाऱ्या दत्ता जाधव विरोधात सबळ पुरावा न मिळाल्याने उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

आरोपीला मिळाला संशयाचा फायदा

दरम्यान, आबा गिरी यानेच रेडीओचे पार्सल बसमध्ये ठेवल्याचा पुरावा नाही, तसेच रेडिओमध्ये सेल टाकल्याबरोबर स्फोट होईल असे सर्किट तयार करण्याएवढा आरोपी तज्ज्ञ नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे संशयाचा फायदा देत न्यायालयाने हा खटला रद्दबातल करून आबा गिरी याची मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले.

बेवारस पार्सल घरी नेणे महागात पडले

एसटीच्या अंबाजोगाई आगारात ओम रमेश निंबाळकर वाहक म्हणून कार्यरत होते. ते २९ नोव्हेंबर रोजी अंबाजोगाई ते कुर्ला बस घेऊन गेले होते. ३० नोव्हेंबर सकाळी ७.३० वाजता अंबाजोगाईला परतले. बसने ११ वाजेच्या सुमारास अंबाजोगाई-लातूर फेरीदेखील केली. कामकाजाची वेळ संपल्याने निंबाळकर काळेगाव घाटला जाण्यास निघाले. त्याआधी त्यांनी बसची तपासणी केली. आढळलेले बेवारस खोके निंबाळकर यांनी आगारात जमा करण्याऐवजी ते घरी नेले होते. त्यात रेडिओ निघाला. रेडिओमध्ये सेल टाकताच दुपारी दीड वाजता जोरदार स्फोट झाला होता. या दुर्घटनेत वाहक ओम निंबाळकर यांचे दोन्ही हात निकामी झाले. परिणामी त्यांना नोकरी गमवावी लागली. पत्नी उषा हिला पाय गमवावे लागले. तर चार वर्षांचा मुलगा कुणाल याला दोन्ही डोळे गमवावे लागले. आई कुसुमबाई यांच्या नशिबी वृद्धापकाळात अपंगत्व आले.

Web Title: Accused acquitted in much-discussed radio blast case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.