रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणारा आरोपी मोकाटच - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:35 AM2021-08-26T04:35:15+5:302021-08-26T04:35:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडा : गोरगरीब जनतेच्या तोंडातील रेशनच्या धान्याचा काळाबाजार करून आपल्या पोळीवर तूप ओढणाऱ्या नेकनूर येथील एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : गोरगरीब जनतेच्या तोंडातील रेशनच्या धान्याचा काळाबाजार करून आपल्या पोळीवर तूप ओढणाऱ्या नेकनूर येथील एका आडत दुकानदाराचे नाव समोर आले आहे. त्याने आता नेकनूर येथून धूम ठोकल्याने त्याला पकडणे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
आजवर या दुकानदाराने किती माल काळ्या बाजारात विकला, हे त्याला पकडल्यावरच समोर येईल. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी या प्रकरणाला महिना होत आला, पण आरोपी मोकाटच आहे. त्या आडत्याला पकडण्यात कोणाचा अडथळा आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे. आष्टी पोलिसांनी २६ जुलै रोजी रात्री पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या किनारा चौकात आयशर टेम्पो
क्रमांक एमएच १६ अेई ९६१६ हा पकडला होता. यात रेशनचा १०५ क्विंटल गहू, तांदूळ असल्याचे निष्पन्न होताच २८ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. टेम्पो चालकाला अटक केल्यानंतर तो नेकनूर येथील एका आडत दुकानदारांचा माल असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी थेट नेकनूर गाठत संबंधित आडत दुकानदारांचा शोध घेतला. पण तोपर्यंत ‘त्या’ व्यापाऱ्याने धूम ठोकली होती. आष्टी पोलिसांनी दोन वेळा त्याचा नेकनूर परिसरात शोध घेतला असता काहीच मागमूस लागला नाही. या घटनेला आता महिना होत आला तरी आरोपीचा शोध लागत नाही.
....
‘त्या’ आरोपीच्या शोधासाठी दोन वेळा नेकनूर परिसरात तपास केला. पण मिळून आला नाही. अजूनही पोलीस त्याचा तपास घेत आहेत.
-प्रमोद काळे, पोलीस उपनिरीक्षक, आष्टी पोलीस स्टेशन.