आरोपीचा कोठडीत मृत्यू, परळीनंतर परभणीच्या पोलिस अधिकाऱ्यालाही बेड्या

By सोमनाथ खताळ | Published: May 13, 2023 12:04 PM2023-05-13T12:04:17+5:302023-05-13T12:04:32+5:30

उमेश कस्तुरे हे २०१४ साली परळी शहर ठाण्यात प्रभारी अधिकारी होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे संभाजीचा मृत्यू झाल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.

Accused dies in custody, Parbhani police officer also arrested after Parli | आरोपीचा कोठडीत मृत्यू, परळीनंतर परभणीच्या पोलिस अधिकाऱ्यालाही बेड्या

आरोपीचा कोठडीत मृत्यू, परळीनंतर परभणीच्या पोलिस अधिकाऱ्यालाही बेड्या

googlenewsNext

बीड : परळी शहर पोलिस ठाण्यातील कोठडीत चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणत बीडच्या सीआयडीने (गुन्हे अन्वेषण विभाग) गुरुवारी परळी शहरचे पोलिस निरीक्षक उमेश कस्तुरे यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. त्यापाठोपाठ आता परभणीच्या सहायक पोलिस निरीक्षकालाही बेड्या ठोकल्या आहेत. दोन दिवसांत दोन पोलिस अधिकाऱ्यांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

संभाजी जोगदंड (रा. नागापूर, खु. ता. परळी) याला चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून परळी शहर पोलिसांनी अटक केली होती. १५ ऑगस्ट २०१४ रोजी त्याचा कोठडीत मृत्यू झाला होता. याप्रकरणात बीड सीआयडीने तपास केला. यात तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, सचिन सारणीकर, विकास वाघमारे, नागरगोजे आणि कातखडे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल केला होता. परंतु संभाजीच्या आईने न्यायालयात धाव घेत आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याला मारहाण करून मारले, असा आरोप केला होता.

यात न्यायालयाने कलम ३०२ वाढवून पुन्हा तपास करा, असा आदेश सीआयडीला दिला. त्याप्रमाणे आता पुन्हा तपासाला सुरुवात झाली असून, गुरुवारी परळी शहरचे पोलिस निरीक्षक उमेश कस्तुरे यांना बेड्या ठोकल्या. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. ते कोठडीत जात नाहीत तोच परभणी येथील कोतवाली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बळवंत जमादार यांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांनाही शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांचा जास्त सहभाग नसल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई बीड सीआयडीचे उपअधीक्षक सुभाष दुधाळ, पोलिस निरीक्षक मनीषा घोडके, योगेश नाईकनवरे, अमोल बागलाने, बंडू सत्वधर यांनी केली.

जमादार, कस्तुरे यांचा सहभाग कसा?

उमेश कस्तुरे हे २०१४ साली परळी शहर ठाण्यात प्रभारी अधिकारी होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे संभाजीचा मृत्यू झाल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. तर सपोनि बळवंत जमादार हे तेव्हा अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयात वाचक शाखेत होते. घटनेच्या दिवशी त्यांनी पेट्रोलिंगदरम्यान त्यांनी परळी शहराला भेट दिली, परंतु आरोपी आहे की नाही? याची नोंदच घेतली नाही. त्यामुळे त्यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. दोन दिवसांत दोन पोलिस अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Accused dies in custody, Parbhani police officer also arrested after Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.