मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी बारा तासांत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:29 AM2021-01-13T05:29:07+5:302021-01-13T05:29:07+5:30
स्थानिक गुन्हे शाखा तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली. अंकुशनगर भागात प्रकाश गायकवाडचा खून करण्यात ...
स्थानिक गुन्हे शाखा तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली. अंकुशनगर भागात प्रकाश गायकवाडचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी तपासाचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने शोधकार्य सुरू केले. यासाठी पोलीस पथके रवाना केली होती. या गुन्ह्याच्या घटनास्थळाची शिवाजीनगर ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखा व पथकांनी बारकाईने पाहणी केली. तसेच यासंदर्भात गुप्त बातमीदारांकडून माहिती प्राप्त केली. १० जानेवारी रोजी सायंकाळी महादेव सर्जेराव शिंदे हा सोबत होता त्यानेच प्रकाशचा खून केला असावा या निष्कर्षावर पोलीस आले. त्यानुसार पोलीस शोध घेत होते. दरम्यान, महादेव शिंदे हा बीड -पिंपळनेर रोडवरील गजानन सूतगिरणीजवळ एका हॉटेलवर आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील अधिकारी, कर्मचारी तत्काळ पोहोचले. काळ्या रंगाच्या दुचाकीसह महादेवाला ताब्यात घेऱ्यात आले. चौकशी केली असता त्याने नाव महादेव सर्जेराव शिंदे (३५, धंदा शेती, रा. शिंदे वस्ती जुना चऱ्हाटा रोड पालवन ता. बीड) सांगितले. पोलीस पथकाने गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याची विचारपूस केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला ताब्यात घेऊन त्याची तात्काळ सरकारी दवाखान्यात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील तपासासाठी त्यास शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले. तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.-------
पळून जाताना आरोपीच्या दुचाकीला अपघात, उपचारादरम्यानही पळून गेला
प्रकाशचा खून केल्यानंतर पळून जाताना मांजरसुंबा घाटाजवळ महादेवच्या दुचाकीला अपघात झाला होता. त्यामुळे तो जखमी झाल्याने त्याला कोणीतरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे तो कोणालाही न सांगता दवाखान्यातून पळून गेला होता, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.