खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप; मनोज जरांगेंसह १३ जणांवर अंबाजोगाईत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 07:35 PM2024-03-15T19:35:19+5:302024-03-15T19:41:25+5:30
जरांगे म्हणाले, मुलीच्या पायाला गोळी लागली; पोलिस म्हणतात, असे काहीही घडले नाही!
अंबाजोगाई (जि. बीड) : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी अंबाजोगाईत संवाद बैठक झाली. याप्रसंगी खोटी माहिती प्रसारित करून सरकारविरोधात प्रक्षोभक भाषण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून मनोज जरांगे यांच्यासह १३ जणांविरोधात अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील हा त्यांच्यावरील सहावा गुन्हा असल्याचे सांगण्यात आले.
अंबाजोगाईतील साधना मंगल कार्यालयात बुधवारी रात्री ८ वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक रात्री दहाच्यानंतर सुरू झाली. रात्री दहाच्यानंतर ध्वनिक्षेपक चालू ठेवून बैठकीसाठी दिलेल्या परवान्याचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तसेच उपस्थित जनसमुदायासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून “या शिंदे साहेबांनी आपला विश्वास तोडलाय. नऊ वर्षांच्या मुलीच्या पायात गोळी घातली, त्या लेकराची गोळी काढताना दीड लिटर पाणी तिच्या पायातून निघाले, तिच्यात तुम्हाला आई-बहीण दिसली नाही का? तुम्हाला आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा, आम्ही तुम्हाला हिसका दाखवणारच..” असे अंतरवाली सराटी येथील घटनेचा संदर्भ देऊन सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले.
मुलीच्या पायाला गोळी लागल्याची अशी कुठलीही घटना घडलेली नसताना खोटी माहिती प्रसारित करून सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने सरकारविरोधात प्रक्षोभक स्वरूपाचे भाषण केले, असा आरोप पोलिस कर्मचारी संतोष बदने यांच्या फिर्यादीत करण्यात आला आहे. या फिर्यादीवरून मनोज जरांगे आणि बैठकीचे आयोजक सचिन सुभाषराव जोगदंड, राजेसाहेब देशमुख, ॲड. माधव जाधव, अमर देशमुख, अजित गरड, रणजीत लोमटे, अमोल लोमटे, राहुल मोरे, ॲड. जयसिंग सोळंके, ॲड. किशोर देशमुख, भीमसेन लोमटे आणि साधना मंगल कार्यालयाचे मालक रविकिरण श्यामसुंदर मोरे यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात भादंवि ५०५ (१)(ब), १८८, सहकलम म.पो.का. १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.