स्टेअरिंगला हिसका देऊन खुनाच्या आरोपीचा पलायनाचा प्रयत्न; जीप उलटून ४ पोलिस जखमी
By संजय तिपाले | Published: November 28, 2022 02:51 PM2022-11-28T14:51:53+5:302022-11-28T14:52:21+5:30
ससेवाडी फाट्यावरील घटना: पंचनाम्यासाठी जाताना खुनातील आरोपीचे कृत्य
बीड: खून प्रकरणात कोठडीत असलेल्या आरोपीने घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी नेताना धावत्या जीपमध्ये चालकाला हिसका दिला. यानंतर जीप उलटून चार पोलीस, दोन पंच व आरोपी असे सात जण जखमी झाले. पाटोदा- मांजरसुंबा महामार्गावरील ससेवाडी फाट्याजवळ २८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
रोहिदास विठ्ठल निर्मळ (रा. मुळूकवाडी ता. बीड) असे आरोपीचे नाव आहे. २६ रोजी सकाळी शेतीवादातून त्याने चुलते बळीराम मसाजी निर्मळ (७५) यांचा कोयत्याने सपासप वार करून खून केला होता. त्याने चुलती केशरबाई बळीराम निर्मळ यांच्यावरही हल्ला केला.वाद सोडविण्यासाठी आलेल्या इतर दोघांना देखील मारहाण केली होती. याप्रकरणी रोहिदाससह त्याचे वडील विठ्ठल आणि आई कौसाबाई निर्मळ यांच्यावर नेकनूर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २६ रोजीच विठ्ठल व कौसाबाई यांना तर २७ रोजी रोहिदासला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्या आई- वडिलांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती तर रोहिदासला एक दिवसाची कोठडी सुनावली होती.
दरम्यान, २८ रोजी आरोपी रोहिदास निर्मळला घेऊन नेकनूर पोलीस जीपमधून (एमएच २३ एफ-१११४) मुळूकवाडीला घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी जात होते. सोबत दोन सरकारी पंच होते. मधल्या सीटवर बसलेल्या आरोपी रोहिदास निर्मळ याचे दोन्ही हात पोलिसांनी पकडून ठेवलेले होते.दरम्यान, ससेवाडी फाट्यावर त्याने आपले डोके चालक व सहायक उपनिरीक्षक चंद्रकांत देशमुख यांच्या डोक्यावर आदळले. त्यामुळे त्यांच्या हाताला झटका बसला. यावेळी रोहिदासने स्टेअरिंगला हिसका दिल्याने जीप रस्त्याखाली उतरून उलटली.
यात सहायक निरीक्षक शेख मुस्तफा, सहायक उपनिरीक्षक चंद्रकांत देशमुख, अंमलदार सचिन मुरूमकर, बाबासाहेब खाडे, पंच म्हणून गेलेले नेकनूर ग्रामपंचायतचे कर्मचारी सय्यद फारेज सय्यद रहेबाज व संदीप काळे हे जखमी झाले. शेख मुस्तफा यांच्या खांद्याला व डोक्याला दुखापत असून आरोपी रोहिदास निर्मळ याच्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. सर्व जखमींवर बीडमध्ये खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत, आरोपीला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
एसपी, एएसपींची भेट
या घटनेनंतर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी खासगी दवाखान्यात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी डॉक्टरांकडून माहिती घेत आवश्यक त्या सर्व तपासण्या व उपचार करण्यास सांगितले.