पीडितेलाच पोलिसांनी धमकावल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:34 AM2021-07-30T04:34:49+5:302021-07-30T04:34:49+5:30
वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन : निलंबनाची मागणी बीड : पीडितेवरील अत्याचाराची, ॲट्रॉसिटीची फिर्याद घेण्यास विलंब करून, तिला जातीवाचक भाषेत ...
वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन : निलंबनाची मागणी
बीड : पीडितेवरील अत्याचाराची, ॲट्रॉसिटीची फिर्याद घेण्यास विलंब करून, तिला जातीवाचक भाषेत शिवीगाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांना गुन्ह्यांमध्ये सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अत्याचाराच्या प्रकरणात पीडितेची फिर्याद घेण्यास विलंब करणारे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मेखले यांनी पीडितेचा चुकीचा जबाब घेऊन, पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचा मानसिक छळ केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. अन्यथा, अनुसूचित जातीजमाती आयोगाकडे न्याय मागणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. तर, जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांनी दिली. यावेळी पीडितेसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.