हातकडीसह पसार आरोपी बायकोला भेटायला निघाला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 11:45 AM2022-09-15T11:45:15+5:302022-09-15T11:47:30+5:30
तब्बल अडीज महिन्यानंतर हातकडीसह पोलिसाच्या तावडीतून पळालेला आरोपीला बावी परिसरात दुचाकीसह जेरबंद
- नितीन कांबळे
कडा (बीड): अत्याचार प्रकरणात फरार असलेला आरोपी मोठ्या शिताफीने पडल्यानंतर पोलीस त्याला ठाण्यात घेऊन येत होते. यावेळी लघुशंकेसाठी पोलिसांची गाडी थांबताच आरोपी हातकडीसह पसार झाल्याची घटना ३० जून रोजी घडली होती. तब्बल अडीज महिन्यानंतर आज पोलिसांनी पुन्हा या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. विकास गायकवाड असे आरोपीचे नाव असून त्यास बावी परिसरातून ताब्यात घेतले.
आष्टी तालुक्यातील धामणगांव येथील २०१९ मध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल असलेला आरोपी विकास कैलास गायकवाड हा अंभोरा पोलिसांना अनेक महिन्यांपासून गुंगारा देत होता. दरम्यान, अंभोरा पोलिसांनी २९ जून रोजी विकासला एका ठिकाणावरून ताब्यात घेतले. ३० जून रोजी पोलिस गाडीतून बीडवरून अंभोरा पोलिस ठाण्यात आरोपीला आणण्यात येत होता. बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्गावरील गारमाथा येथे गाडी लघुशंकेसाठी थांबवली. यावेळी संधी साधत विकास पोलिसांच्या हाताला झटका देत हातकडीसह पसार झाला.
आरोपी पुढे, पोलिस मागे असा पाठलाग काही काळ चाला मात्र, विकास पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार झाला होता. दरम्यान, आज विकास धामणगाव या सासरवाडीच्या ठिकाणी पत्नीला भेटण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. धामणगाव येथे दुचाकीवर जात असताना बावी परिसरातून पोलिसांनी पुन्हा एकदा विकासला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखीली अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, आदिनाथ भडके, अंमलदार कल्याण राठोड, अमोल शिरसाठ, शिवदास केदार, भागवत हवेले, सतिश पैठणे, यांनी केली.