दोन दिवसापूर्वी सुटी झालेला आरोपी दुसऱ्याच दिवशी कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:58+5:302021-06-05T04:24:58+5:30
धारूर : धारूर येथील कोविड केअर सेंटरमधून सुटी दिलेला तरूण दुसऱ्याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात ...
धारूर : धारूर येथील कोविड केअर सेंटरमधून सुटी दिलेला तरूण दुसऱ्याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका चोरीच्या प्रकारातून हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. यातून धारूर आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघड झाला आहे.
आरोग्य विभागाच्या उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी की, धारूर पोलीस कर्मचारी यांनी गुरुवारी घाटात झालेल्या चोरीच्या घटनेत तीन तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार होते तत्पूर्वी आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ज्या तरुणाला कालच कोविड सेंटरमधून सुटी देण्यात आली होती, तोच तरूण कोरोना बाधित निघाला आहे. यामुळे आता आरोग्य विभागाच्या उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
सुटी देण्यापूर्वी रुग्णांची सर्व तपासणी करणे गरजेचे असते परंतु, असे काही केल्याचे दिसून येत नाही. आरोग्य विभागाच्या या चुकीमुळे पोलीस कर्मचारी यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.
न्यायालयात हजर करण्यापूर्वी केली टेस्ट - एएसआय - बास्टे धारूर घाटातील चोरीच्या प्रकरणातील तीन तरुण आरोपींना न्यायालयासमोर हजर करायचे होते त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात तिघांपैकी एक आरोपी पॉझिटिव्ह आला आहे. त्याला उपचारासाठी धारूर येथील कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे, असे धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोंविद बास्टे यांनी सांगितले.