‘समृद्ध जीवन’ घोटाळ्यात आरोपी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:21 AM2021-11-22T11:21:39+5:302021-11-22T11:22:24+5:30
जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या समृद्ध जीवन मल्टीस्टेटविरुद्ध ३० ऑगस्ट २०१८ रोजी बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
बीड : समृद्ध जीवन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह घोटाळ्याचा मास्टरमाईंड महेश मोतेवार (५३) सध्या बीड शहर पोलिसांच्या कोठडीत आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून आरोपींची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. बीड शहर पोलिसांनी समृद्ध जीवनच्या संचालक मंडळांची माहिती मागवली आहे.
जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या समृद्ध जीवन मल्टीस्टेटविरुद्ध ३० ऑगस्ट २०१८ रोजी बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. मूळ तक्रारीत समृद्ध जीवनचा संचालक महेश किसन मोतेवार, प्रतिनिधी सुनीता किसन थोरात, शशिकांत रवींद्र काळकर या तिघांचा आरोपींत समावेश आहे. तीन वर्षांत सक्षम यंत्रणेकडे तपास नसल्याने शहर पोलीस यातील एकालाही अटक करू शकले नाहीत. दरम्यान, १७ रोजी महेश मोतेवारला गुजरातच्या राजकोट मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेत बीडला आणले. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
सुरुवातीला पाच कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद होते; पण पोलिसांच्या तपासात आतापर्यंत अडीच हजार ठेवीदारांची २५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
महेश मोतेवारकडे चौकशी सुरू आहे. मात्र, या प्रकरणाला तीन वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळे पुरावे गोळा करण्याला प्राधान्य राहणार आहे. गुंतवणूकदारांनी पुढे येऊन तपासासाठी पुरावे देऊन सहकार्य करावे.
- रवी सानप, पोलीस निरीक्षक, बीड