अत्याचाराच्या गुन्ह्यात डॉक्टरने चुकविले आरोपीचे नाव; बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 03:40 PM2018-11-28T15:40:33+5:302018-11-28T15:45:06+5:30

दोनवेळेस परत आलेला मुद्देमाल तिसऱ्यांदा पाठविला आहे.

The accused's name was missed by a doctor in the crime of atrocities; Type of Beed District Hospital | अत्याचाराच्या गुन्ह्यात डॉक्टरने चुकविले आरोपीचे नाव; बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार 

अत्याचाराच्या गुन्ह्यात डॉक्टरने चुकविले आरोपीचे नाव; बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार 

googlenewsNext
ठळक मुद्देदोनवेळा निघाल्या त्रुटी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून मुद्देमाल परत

बीड : जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरने हलगर्जीपणा करीत अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपीचे नाव चुकविले आहे. एवढेच नव्हे तर पुन्हा रक्त नमुन्यातही चूक केल्यामुळे न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेने हा मुद्देमाल परत पाठविला आहे. दोनवेळेस परत आलेला मुद्देमाल तिसऱ्यांदा पाठविला आहे. डॉक्टरच्या चुकीमुळे गंभीर गुन्ह्यात पुरावे जमा करण्यात पोलिसांची धावपळ होत आहे. आज हा धक्कादायक प्रकार समोर आला.

महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीला २२ वर्षीय तरूणाने बीडमधून पळवून नेले होते. त्याचा शोध पुण्यात घेऊन त्याला बीडला परत आणले. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरून त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करून रक्त, केस, नखे व इतर आवश्यक वैद्यकीय पुरावे जप्त केले. डॉक्टरांमार्फत ते न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याच्या एका चुकीमुळे आरोपीचे नाव चुकले. त्यामुळे हा रिपोर्ट परत आला.

यात दुरूस्ती करून तो पुन्हा पाठविला. यामध्ये रक्ताचे दोन नमुने घेतल्याचे लिहिले. प्रत्यक्षात एकच नमुना घेतला होता. त्यामुळे दुसऱ्यांदा हा अहवाल परत आला. आता मंगळवारी पुन्हा तपास अधिकाऱ्यांनी हा अहवाल पाठविला आहे. आता यामध्ये आणखी त्रुटी निघते की बरोबर समजला जातो, हे नंतरच कळणार आहे.

दोषारोप पत्र दाखल करण्यास विलंब
वैद्यकीय पुरावे न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून वेळेवर न आल्यामुळे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यास विलंब होत आहे. यामध्ये पोलिसांची धावपळ होत असल्याचे दिसून येते. डॉक्टरांची एक चूक किती महागात पडते, याचे हे उदाहरण ठरले आहे. आणखी इतर गुन्ह्यांत पण अशीच परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे. एमएलसी विभागातून पोलिसांना वेळेवर कागदपत्रे मिळत नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. इतरांच्या अडचणी सोडविणाऱ्या  पोलिसांना  मात्र स्वत:ला त्रास सहन करावा लागत असताना मूग गिळून गप्प रहावे लागत असल्याचे बोलले जात आहे.

पोलीस अन् वैद्यकीय अधिकारी म्हणतात...
दरम्यान, तपास अधिकारी पोउपनि बी.एस.ढगारे यांना याबाबत विचारले असता, त्यांनी याला दुजोरा दिला आहे. तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर वैद्यकीय अधिकारी ए.ए.जाधव म्हणाले, हा प्रकार नजरचुकीने झाला आहे. फॉर्मवर दोन ठिकाणी नाव बरोबर आहे. नमुन्याबाबत टेक्निकल बाबी आहेत. कोणी मुद्दामहून असे करत नाही.

गंभीर बाब 
दोनवेळेस चुक झाली असेल तर गंभीर बाब आहे. याची चौकशी केली जाईल. यात डॉक्टरला नोटीस बजावून योग्य ती कारवाई केली जाईल. 
- सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक, बीड

चौकशी केली जाईल 
प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन चौकशी केली जाईल. गंभीर गुन्ह्यात असे झाले असेल तर योग्य ती कारवाई केली जाईल. कुठल्याच प्रकरणात हलगर्जीपणा होऊ नये.
डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

Web Title: The accused's name was missed by a doctor in the crime of atrocities; Type of Beed District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.