इच्छाशक्ती, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून यश संपादन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:35+5:302021-05-23T04:33:35+5:30
गेवराई : जिद्द, प्रामाणिक इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण प्रयत्नांतून यश संपादन करता येते, असे प्रतिपादन बुलढाणा येथील अप्पर पोलिस अधीक्षक ...
गेवराई : जिद्द, प्रामाणिक इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण प्रयत्नांतून यश संपादन करता येते, असे प्रतिपादन बुलढाणा येथील अप्पर पोलिस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील र. भ. अट्टल महाविद्यालय स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेल आयोजित पाच दिवशीय करिअर मार्गदर्शन वेबिनार कार्यशाळेत ते बोलत होते.
स्पर्धा परिक्षा पूर्वतयारी या विषयावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले, विपरित परिस्थितीचे भांडवल न करता स्वतः पूर्णवेळ अभ्यास व प्रयत्न करावा. तसेच उपलब्ध साधनसामग्रीच्या सकारात्मक उपयोगातून संघर्षमय स्थितीत यश संपादन करता येते. यावेळी त्यांनी आपला प्राथमिक शिक्षक ते अप्पर पोलिस अधीक्षक पदापर्यंतचा प्रवास कथन केला. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शरीर व बुध्दी, मन याचा योग्य संयम राखणे, पदानुसार अभ्यासक्रम व संकल्पना समजून घेणे महत्त्वपूर्ण आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करताना वर्तमानपत्रातील संपादकीय लेखांचे काळजीपूर्वक वाचन, यश, अपयशाचे मूल्यमापन व ते स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेऊन प्रामाणिक प्रयत्न व मेहनतीने यश मिळवावे, असे आवाहन बनसोडे यांनी कार्यशाळेतील पहिल्या सत्रात केले. प्रास्ताविक, रुपरेषा आणि पाहुण्यांचा परिचय समाधान इंगळे यांनी करून दिला. वेबिनारच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ.रजनी शिखरे, उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, प्रबंधक बप्पासाहेब पिंपळे, कार्यक्रम संयोजक प्रा. हनमंत हेळंबे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व स्पर्धा परिक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. पुढील २५ तारखेपर्यंत हे वेबिनार दररोज सकाळी ११ वाजता लाईव्ह राहणार असल्याचे सांगण्यात आले.
===Photopath===
220521\sakharam shinde_img-20210522-wa0021_14.jpg