बीड जिल्ह्यात ग्रामीण शाळांत ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर १९ गुरुजींवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:58 PM2018-08-07T23:58:54+5:302018-08-07T23:59:31+5:30
बीड : तालुक्यातील डोंगरदरी, दुर्गम भागातील शाळांची अचानक तपासणी केल्यानंतर सुटीच्या दिवशी सुनावणी घेत १९ गुरूजींवर विविध स्वरुपाची कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर कमी पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे पालकांशी चर्चा करून जवळपासच्या चांगल्या गुणवत्तेच्या शाळेत समायोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
डोंगरदऱ्यांतील तसेच दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असते. तरीही दोन शिक्षक नियुक्त असतात. परंतू या शाळांची गुणवत्ता ढासळत असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात आले. एकाच दिवशी सर्व ग्रामपंचायतींची झाडाझडती घेण्यात आली होती. यावेळी दुर्गम भागातील काही शाळा बंद असल्याचे तर काही शाळांमध्ये शिक्षक गायब तर काही ठिकाणी मुलांची गुणवत्ता कमी असल्याचे दिसून आले होते. शितावरून भाताची परीक्षा झाल्याने बीड तालुक्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची तपासणी अतिशय गुप्तता राखून करण्यात आली.
सायंकाळी सात वाजता विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकाºयांची बैठक घेऊन त्यांना शनिवारी सकाळी ७ वाजता जिल्हा परिषदेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले. शनिवारी सकाळी साडेसात वाजता बीड तालुक्यातील १० पेक्षा कमी पटसंख्येचया २० शाळांची तपासणी करण्यासाठी १० विस्तार अधिकारी निघाले. शाळांची नावे त्यांना त्याच वेळी समजली, त्यामुळे शिक्षकांना हा एक सर्जिकल स्ट्राइक ठरला. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निर्देशानुसार तेथील माहिती संकलित करुन अहवाल सादर केले. दुसºयाच दिवशी कारवाई करण्यात आली. आता बीडनंतर कोणत्या तालुक्यात तपासणी होणार आहे, याकडे लक्ष लागले आहे.
गुणवत्ता ढासळली, दांडीयात्राही
शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर २० पैकी १३ शाळांमध्ये शिक्षक उपस्थिती, शाळा वेळेत उघडणे, गुणवत्ता याबाबत असमाधानकारक स्थिती आढळली. ४ शाळा वेळेवर उघडल्या नव्हत्या. ३ शाळा बंद आढळून आल्या. ५ शिक्षक अनधिकृत गैरहजर आढळून आले. तर पाच शिक्षकांच्या रजा होत्या मात्र त्यांच्या अर्जात त्रुटी होत्या.
शनिवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी १३ शाळांतील १९ शिक्षकांना गैरवर्तणुकीबाबत नोटीस दिल्या. व रविवारी खुलाशासह सुनावणीसाठी समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले. तसेच तपासणी अधिकारी, केन्द्र प्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापकांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या.
रविवारी दुपारी १ वाजता संबंधितांनी खुलासे दिले. त्याचे अवलोकन केल्यानंतर सुनावणी झाली. प्रत्येक शिक्षकाने आपले म्हणणे मांडले. त्याबाबत तपासणी अधिकाºयांकडून शहानिशा करण्यात आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुनावणी पूर्ण झाली.