गेवराईत विनामास्क फिरणाऱ्या ३७ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:50 AM2021-02-23T04:50:55+5:302021-02-23T04:50:55+5:30
गेवराई : मागील दीड महिन्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. मात्र, पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे प्रशासन ...
गेवराई : मागील दीड महिन्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. मात्र, पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने पोलीस व नगरपालिका प्रशासनाकडून शहरात मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात रविवारी मोहीम राबविण्यात आली. ३७ वाहने पकडून त्यांच्याकडून ७ हजार ४०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या दीड महिन्यात कमी झाला होता. त्यामुळे नागरिक बिनधास्त विनामास्क फिरताना दिसत होते. त्यात पुन्हा काही दिवसांपासून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनासह सर्व विभाग खडबडून जागे झाले आहेत. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना पुन्हा मास्क घालण्याची सवय लागावी, शहरात दुचाकी वाहनावर फिरणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोभे, मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्यातर्फे मार्गदर्शन मोहीम राबविण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळपासून विनामास्क फिरणाऱ्या ३७ नागरिकांची वाहने पकडून त्यांच्याकडून ७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यावेळी पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप काळे, पोलीस इंद्रजित गायकवाड, किरण पोद्दार, दिलीप सरोदे यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी कैलास माटे, राम सुतार, दिलीप वडमारे, रामेश्वर घोडके, विष्णू सुतार उपस्थित होते.