केजमध्ये ४० वीजचोरांवर कारवाई, २७ जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 06:45 PM2021-03-12T18:45:36+5:302021-03-12T18:47:43+5:30
केज तालुक्यात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने केज उपविभागातील सहा शाखेत रोहित्र जळणे व नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ
केज : तालुक्यात वीजचोरी वाढल्याने रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली. वीजगळतीच्या प्रमाणात वाढ झाल्याने केज विद्युत वितरण कंपनीने वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम चालू केली आहे. वीजचोरी करणाऱ्या ४० जणांविरुद्ध कारवाई करत ३ लाख ८७ हजार ३९० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर २७ जणांविरुद्ध वीजचोरी केल्याप्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी लोकमतला दिली.
केज तालुक्यात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने केज उपविभागातील सहा शाखेत रोहित्र जळणे व नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्यास सुरवात करत केज तालुक्यातील नायगाव सुकळी येथे सहा, आवंढ शिरपुरा येथे दहा, भालगाव येथे चार, बावचीत एकावर तर कवडगाव येथे एका वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध वीजचोरी केल्याप्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर केज शहरातील सात विद्युतग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली आहे. या सात ग्राहकांनी विद्युत मीटरमधून वीज चोरी केल्याचे आढळून आल्याने त्यांना दंडाची आकारणी करण्यात आली आहे. दंडाचा भरणा न केल्यास त्यांच्याविरुद्ध अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ही कारवाई विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता कोलप यांच्या मार्गदर्शनाखाली केज विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर, सहायक अभियंता अमोल मुंडे, सचिन चव्हाण, रोशन रामेकर, रामराव नाकाडे व केज उपविभागातील वीज कर्मचाऱ्यांनी केली आहे.
मोहीम सुरूच राहणार
तालुक्यात ४० लोकांवर कारवाई करत ३ लाख ८७ हजार ३९० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर २७ जणाविरुद्ध अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तालुक्यात या पुढेही वीजचोरी करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मोहीम चालूच राहणार असल्याचे केज विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी लोकमतला सांगितले.