स्वत:कडे २८ कोटींची वीज थकबाकी ठेवून सामान्यांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:04 AM2021-02-06T05:04:17+5:302021-02-06T05:04:17+5:30
बीड : सध्या मार्च अखेरमुळे सर्वच कार्यालये थकबाकी वसुलीवर भर देत आहेत. यात बीड पालिका व महावितरणचाही समावेश आहे. ...
बीड : सध्या मार्च अखेरमुळे सर्वच कार्यालये थकबाकी वसुलीवर भर देत आहेत. यात बीड पालिका व महावितरणचाही समावेश आहे. पालिकेने सामान्यांना कारवाईची भीती दाखवत कर वसुली सुरू केली आहे. वास्तविक पाहता पालिकेकडेच महावितरणची तब्बल २८ कोटींची थकबाकी आहे. महावितरणने वारंवार पत्र व्यवहार करूनही अद्याप ती भरलेली नाही.
बीड नगर परिषद ही सध्या आर्थिक संकटात सापडलेली आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांनी कर भरला नाही. नळपट्टी, घरपट्टी व इतर मालमत्ता करापोटी शहरवासियांकडे जवळपास १५ कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे. आता मार्च अखेरमुळे पालिकेने उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर वसुलीवर भर दिला आहे. नागरिकांना नोटीस बजावल्या जात आहेत. कर वसुलीसाठी वेगवेगळे विभाग करून कर वसुली केली जात आहे. एकीकडे पालिका कर वसुलीवर भर देत असली तरी स्वत:कडील इतर विभागांची थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. केवळ पाणी पुरवठ्याची पालिकेकडे २८ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. मागील अनेक वर्षांपासून महावितरणने ही थकबाकी भरण्यासाठी पत्र पाठविले, परंतु याला कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. आता देयकावर व्याज वाढत गेल्याने ही रक्कम दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे.
महिन्याकाठी ४० लाख रुपये बिल
बीड शहराला माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. तसेच इट येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या सर्व ठिकाणी महिन्याकाठी जवळपास ४० लाख रुपयांचे बिल पालिकेला येते. पालिकाही आलेले बिल भरते. परंतु जुनी थकबाकी भरण्यास हात आखडता घेत आहे.
कोट
बीड नगर पालिकेकडे २८ कोटींची थकबाकी आहे. ती भरण्यासाठी वारंवार पत्र पाठविले जात आहे.
रवींद्र कोळप
अधीक्षक अभियंता, महावितरण, बीड
कोट
जुनी थकबाकी आहे. रेग्युलर बिल प्रत्येक महिन्याला भरले जाते. जुनी थकबाकी असल्याने व्याज वाढत असल्याने थकबाकीचा आकडाही वाढत आहे.
कोमल गावंडे
अभियंता, विद्युत विभाग, न. प. बीड
पालिकेकडे पाणीपुरवठ्याची थकबाकी
काडीवडगाव पाणी पुरवठा - १३ कोटी ८६ लाख ५४ हजार ९२८
पिंपळगाव पाणी पुरवठा - १४ कोटी २९ लाख ३८४
नगर परिषद इमारत - २ लाख ४७ हजार ३४८