मांजरसुंबा घाटातील हॉटेल, ढाब्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:20+5:302021-07-19T04:22:20+5:30
बीड : कोरोना संसर्ग वाढण्याची भीती असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मात्र, अनेक जण या निर्बंधांचे ...
बीड : कोरोना संसर्ग वाढण्याची भीती असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मात्र, अनेक जण या निर्बंधांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत होते. शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊनमुळे पूर्ण बंद असतानादेखील हॉटेल व काही दुकाने उघडी होती. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे महसूल व पोलीस विभागाच्या ताफ्यासह रस्त्यावर उतरले. बीड शहरासह मांजरसुंबा घाटात तपासणी करून नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया केल्या.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना वाढत असलेले रुग्ण आणि संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासन कडक पाऊल उचलत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने शनिवारी जिल्ह्यातील तीन तालुक्यांत निर्बंध आणखी कडक केले होते. रविवारी वीकेंड लॉकडाऊन असताना काही दुकाने व हॉटेल खुली असून, त्याठिकाणी गर्दी असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी बीड शहरात पाहणी केली. काही ठिकाणी दुकाने उघडी असल्याचे दिसून आल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली.
१० ते २५ हजारांपर्यंत दंड वसूल
दरम्यान, सोलापूर-धुळे महामार्गालगतच्या मांजरसुंबा घाटाच्या परिसरातील हॉटेल हरयाणा-गुजरात ढाबा, हॉटेल कन्हैया याठिकाणी गर्दी आढळून आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही हॉटेलचालकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड आकारला. याच परिसरातील राजगड व जायका या हॉटेलचालकांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, तसेच यापुढे नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारादेखील अधिकाऱ्यांनी दिला. या कारवाईत बीड, नेकनूर पोलिसांनीदेखील सहभाग घेतला होता.
कपिलधारमध्ये पर्यटकांना हुसकावले
जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी कपिलधार येथे भेट दिली असता, पर्यटकांची मोठी गर्दी याठिकाणी होती, तसेच त्यापैकी अनेकांनी तोंडाला मास्क लावलेले नव्हते. जमावबंदी लागू असल्याचे सांगून त्याठिकाणावरून पर्यटकांना हुसकावून लावत कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हॉटेलमध्ये तोबा गर्दी
जिल्हाधिकाऱ्यांनी मांजरसुंबा घाटात हॉटेलची पाहणी केली असता, क्षमतेपेक्षा जास्त नागरिक हॉटेलमध्ये जेवण करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर हॉटेलचालकांना बोलावून घेत त्यांना कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात सांगून दंडात्मक कारवाई केली.
कोरोना संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे पालन करावे, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, त्यावेळी सर्व प्रकारची काळजी घ्यावी यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे.
नामदेव टिळेकर, उपविभागीय अधिकारी, बीड