धाराशिवचे डीवायएसपी स्वप्नील राठोडवर होणार कारवाई; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:05 IST2025-04-23T13:05:00+5:302025-04-23T13:05:38+5:30

बीडमधील मुलीचे आत्महत्या प्रकरण; डीवायएसपी राठोड यांनी तुच्छ वागणूक दिली. तपासाला दिरंगाई केली. जबाब व्यवस्थित घेतले नाहीत.

Action will be taken against Dharashiv's DYSP Swapnil Rathod; Deputy Speaker Neelam Gorhe assures | धाराशिवचे डीवायएसपी स्वप्नील राठोडवर होणार कारवाई; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची ग्वाही

धाराशिवचे डीवायएसपी स्वप्नील राठोडवर होणार कारवाई; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची ग्वाही

बीड : बीडमधील एका तरुणीने छेडछाडीला कंटाळून धाराशिवमध्ये मामाच्या घरी जाऊन गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणात आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देताच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी बीडमध्ये येऊन कुटुंबाची भेट घेतली. यावेळी आईने त्यांच्याकडे एक अर्जही दिला आहे. त्याप्रमाणे धाराशिवचे पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.

साक्षी कांबळे (वय २०, रा. बीड) या मुलीने बीडमधीलच अभिषेक कदम याच्या त्रासाला कंटाळून १४ मार्च रोजी धाराशिव येथे मामाच्या घरी आत्महत्या केली होती. याच मुलीचा विवाह २० एप्रिल रोजी होणार होता. त्याच्या आदल्या दिवशी आई कोयना विटेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र देऊन न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंगळवारी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कोयना यांची भेट घेतली. यावेळी सर्व माहिती घेतली असून, ती आपण सरकारला कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच प्रकरणातील तपास अधिकारी उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही याची गंभीर दखल घेतली असून, पोलिस अधीक्षक धाराशिव यांनाही चौकशी करून कारवाईचे निर्देश दिल्याचे गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महिलेच्या अर्जात काय मुद्दे?
डीवायएसपी राठोड यांनी तुच्छ वागणूक दिली. तपासाला दिरंगाई केली. जबाब व्यवस्थित घेतले नाहीत. आरोपी मुलगा २२ दिवसांनी १० गाड्यांचा ताफा घेऊन एखाद्या नेत्यासारखा पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर अवघ्या ८ ते १० दिवसांतच जामीनही झाला. मुलगा विद्यार्थी असून, कुठलेही पुरावे नाहीत, आत्महत्या कशामुळे झाली हे निश्चित नाही, असे कारण दाखवून जामीन दिला. याला पोलिसांचा रिपोर्ट जबाबदार आहे. या प्रकरणात आता आरोपी मुलाची जामीन नामंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, तपास सीआयडीमार्फत करावा व आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांची नियुक्ती करावी, डीवायएसपी राठोड यांना बडतर्फ करावे, आरोपी अभिषेक कदम याला फाशीची शिक्षा द्यावी, आरोपीची बहीण शीतल कदम ही पोलिस असून, तिलाही अटक करून कारवाई करावी, अशी मागणी कोयना विटेकर यांनी डॉ. गोऱ्हे यांच्याकडे केली आहे.

Web Title: Action will be taken against Dharashiv's DYSP Swapnil Rathod; Deputy Speaker Neelam Gorhe assures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.