गेवराई तालुक्यात शासकीय धान्य पकडणार्या ‘त्या’ दोन महिलांवर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 02:07 PM2017-12-23T14:07:31+5:302017-12-23T14:12:19+5:30
गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात शासकीय धान्य पकडून काळ्या बाजारात जात आहे, असा आरोप करीत दक्षता समितीच्या दोन वकील महिलांनी धान्याचा टेम्पो पोलीस ठाण्यात नेला.तपासणी व इतर कारवाईत तीन दिवस गेले. यामध्ये लाभार्थ्यांचे हाल झाले, तसेच पुरवठा विभागाची बदनामीही झाली. हाच ठपका ठेवून अॅड. संगीता धसे व संगीता चव्हाण या दोघींवर कारवाई कारण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी एन.आर. शेळके यांनी दिली.
बीड : गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात शासकीय धान्य पकडून काळ्या बाजारात जात आहे, असा आरोप करीत दक्षता समितीच्या दोन वकील महिलांनी धान्याचा टेम्पो पोलीस ठाण्यात नेला. तपासणी व इतर कारवाईत तीन दिवस गेले. यामध्ये लाभार्थ्यांचे हाल झाले, तसेच पुरवठा विभागाची बदनामीही झाली. हाच ठपका ठेवून अॅड. संगीता धसे व संगीता चव्हाण या दोघींवर कारवाई कारण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी एन.आर. शेळके यांनी दिली.
कुठलाही अधिकार नसताना आम्ही दक्षता समितीच्या सदस्या आहोत, असे सांगत तलवाडा येथे अॅड. धसे व चव्हाण यांनी जातेगाव, सुलतानपूर येथे जाणारा शासकीय धान्याचा टेम्पो अडविला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचे हाल होत असल्याची तक्रार जातेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा मुलगा बुद्धभूषण वक्ते यांनी पुरवठा विभागाकडे केली होती. यावर गंभीर दखल घेत पुरवठा विभागाने चौकशी लावली आहे. यामध्ये सर्वंकष चौकशी करून या दोन्ही महिलांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एन.आर. शेळके यांनी सांगितले.
त्यामुळे आता या दोघींवर दक्षता समितीचे नाव पुढे करून केलेली कारवाई चांगलीच भोवणार असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही वकील महिलांवर कठोर कारवाई करावी व न्याय द्यावा, अशी मागणी गेवराई तालुका स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दुकानदारांनी दिला आहे.
मी कामात आहे
याबाबत अॅड.संगिता चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता, त्या म्हणाल्या, मी आता कामात आहे. मी तुम्हाला भेटून प्रतिक्रिया देते, असे सांगितले. तर अॅड. संगीता धसे यांनी भ्रमणध्वनी न घेतल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.