जीव वाचविण्यात मानवी चुका आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:54 AM2021-05-05T04:54:26+5:302021-05-05T04:54:26+5:30
अंबाजोगाई : लोकांचे जीव वाचविण्यात जर आता मानवी चुकांमुळे अडथळा आला, तर मी कोणाचीही गय करणार नाही, संबंधिताना कारवाईला ...
अंबाजोगाई : लोकांचे जीव वाचविण्यात जर आता मानवी चुकांमुळे अडथळा आला, तर मी कोणाचीही गय करणार नाही, संबंधिताना कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महावितरणचे अधिकारी व स्वाराती प्रशासनाला दिली आहे. स्वाराती रुग्णालयात एकूण ऑक्सिजन बेडची संख्या व उपलब्ध संसाधने पाहता आणखी ५० बेड वाढविणे शक्य आहे, ते बेड तातडीने तयार करून रुग्णांसाठी खुले करावेत, असे निर्देश यावेळी मुंडेंनी रुग्णालय प्रशासनाला दिले.
सोमवारी दुपारी पालकमंत्री मुंडे यांनी येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयास अचानक भेट दिली. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून त्यांनी दाखल असलेली एकूण रुग्णसंख्या, उपलब्ध व शिल्लक बेड, रेमडेसिविर इंजेक्शनची वितरण प्रक्रिया, ऑक्सिजन पुरवठा या सर्वच बाबींचा बारकाईने आढावा घेतला. यावेळी मुंडे यांनी बेड, रेमडेसिविर इंजेक्शन, अन्य औषधी, पीपीई किट या सर्वच बाबींची विचारपूस केली. ऑक्सिजन पुरवठा गरजेनुसार, सुरळीत व अपव्यय टाळून करण्याच्या सूचना केल्या. यावेळी आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, वाल्मीक कराड, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, डॉ. नितीन चाटे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता बनसोडे, महावितरणचे अभियंता संदीप चाटे, शिवाजी सिरसाट, दत्ता आबा पाटील, विलासराव सोनवणे, रणजित चाचा लोमटे आदी उपस्थित होते. स्वारातीमध्ये सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर्सच्या ड्यूटीचे विवरण तपासावे, तसेच स्पेशालिस्ट व उपलब्ध असलेल्या अन्य डॉक्टरांची किमान दोन दोन तासांची सेवा लोखंडी येथील रुग्णालयास उपलब्ध करून द्यावी, असेही यावेळी मुंडेंनी सुचवले आहे.
पर्यायी विद्युत पुरवठा तातडीने उभा करा
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मिळून स्वतंत्र सबस्टेशन दिलेले आहे, मात्र इथे तज्ज्ञ लोक मिळत नाहीत. जनरेटरला डिझेल भरायला ५ तास वेळ लागतो, एक किलोमीटरची केबल वायर मिळत नाही, अशा तक्रारींवरून मुंडेंनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ११ केव्ही लाइनसाठी केबल वायर मिळत नसेल तर ती मी उपलब्ध करून देतो; पण यात कोणाचाही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा मुंडेंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
===Photopath===
030521\03_2_bed_14_03052021_14.jpeg
===Caption===
अंबाजोगाईत आणखी ५० ऑक्सिजन बेड वाढविणार