उपस्थिती नसेल तर अॅक्शन घेणार; बीड जि.प.च्या सीईओंचा पहिल्याच दिवशी दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 06:45 PM2018-02-07T18:45:43+5:302018-02-07T18:48:35+5:30
जिल्हा परिषदेत आज रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट केली. यावेळी गैरहजर राहणार्या तब्बल २१ कर्मचार्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला.
बीड : जिल्हा परिषदेत आज रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट केली. यावेळी गैरहजर राहणार्या तब्बल २१ कर्मचार्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. पदभार स्वीकारल्यानंतर येथील प्रशासन गतिमान करणे हेच आपले व्हिजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सीईओ अमोल येडगे २०१४ च्या आयएएस बॅचमधील अधिकारी आहेत. या आधी ते कळमनुरी येथे उपविभागीय अधिकारी, नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी या पदांवर कार्यरत होते. बीड जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून त्यांची पहिलीच पोस्टींग आहे. पदभार घेताच आज त्यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यात त्यांनी जिल्या परिषदेच्या कामांची सद्य स्थिती जाणून घेतली. तसेच सांघिक भावनेतून कसे काम करायचे याबाबत सर्व कर्मचा-यांना सूचना दिल्या.
प्रशासन गतिमान करण्यास प्राधान्य
बीडमध्ये काम करणे आपल्यासाठी आव्हानात्मक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. यासोबतच शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकासासाठी प्रशासनाकडून चांगले काम करण्याचा प्रयत्न राहील. येथे पायाभूत सुविधेसह कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून प्रशासन गतीमान करण्याचे आपले व्हिजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘उपस्थिती नसेल तर अॅक्शन’
येडगे यांनी पदभार स्वीकारताच सकाळी नवगण राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, खोकरमोहा जि. प. शाळा व अंगणवाडी तसेच शिरुर पंचायत समितीला अचानक भेटी दिल्या. तेथे गैरहजेरीबरोबरच अंतर्गत स्वच्छतेचा अभाव दिसून आला. राजुरी प्रा. आरोग्य केंद्रात ६ तर शिरुर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी सोनवणे यांच्यासह १५ कर्मचारी गैरहजर आढळले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ‘उपस्थिती नसेल तर अॅक्शन’ अशा शब्दात त्यांनी दांडीबहाद्दरांना इशारा दिला.
हार, बुकेऐवजी पुस्तके
पदभार स्वीकारल्यानंतर स्वागतामध्ये हार व बुकेंचा स्वीकार न करता यडगे यांनी पुस्तकांचा स्वीकार केला. पुस्तके शाळांना भेट देण्यासाठी तसेच वाचनासाठी उपयोगात येतील असे ते म्हणाले. या माध्यमातूनच ४० आश्रमशाळां व ८१ फिरत्या वाचनालयांना आपण सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.