रक्त चाचणीच्या नावाखाली गोरगरीब कोरोना रुग्णांना लुटणारे रॅकेट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:35 AM2021-05-18T04:35:26+5:302021-05-18T04:35:26+5:30

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : कोरोना महामारीच्या भीतीने सर्व जण पछाडलेले आहेत. या भीतीच्या आडून खासगी रक्त तपासणी लॅबचालकांनी दलालांच्या ...

Activating racket to rob poor corona patients under the guise of blood test | रक्त चाचणीच्या नावाखाली गोरगरीब कोरोना रुग्णांना लुटणारे रॅकेट सक्रिय

रक्त चाचणीच्या नावाखाली गोरगरीब कोरोना रुग्णांना लुटणारे रॅकेट सक्रिय

Next

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : कोरोना महामारीच्या भीतीने सर्व जण पछाडलेले आहेत. या भीतीच्या आडून खासगी रक्त तपासणी लॅबचालकांनी दलालांच्या माध्यमातून गोरगरीब कोरोना रुग्णांची दिशाभूल करत अक्षरशः लूट सुरू केल्याचा लोखंडी सावरगावच्या कोविड रुग्णालयातील प्रकार जिल्हा परिषद सदस्य अविनाश मोरे यांनी उघडकीस आणला आहे. या रॅकेटमध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी सामील असल्याचे आढळून आल्यानंतर अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी त्यास निलंबित केले असून, एका खासगी लॅबच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील नागनाथ पांचाळ आणि त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर लोखंडीच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी तिथे नंदकिशोर पांचाळ या रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याने त्यांना रक्त तपासणी अत्यंत आवश्यक असून, त्यासाठी दोन व्यक्तींसाठी साडेसहा हजार रुपये लागतील, असे सांगितले. आधीच कोरोनामुळे घाबरलेल्या नागनाथ पांचाळ यांनी तयारी दर्शविल्यानंतर नंदकिशोर पांचाळने खासगी लॅबच्या माणसाला बोलावून घेत तपासणीसाठी रक्त दिले. याबाबत नागनाथ यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर बर्दापूर जि.प. सर्कलचे सदस्य अविनाश मोरे यांनी लॅबचालकास चांगलेच फैलावर घेतले आणि नंतर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांना याबाबत कळविले.

याप्रकरणी अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी सखोल चौकशी केली असता रुग्णालयातील नंदकिशोर पांचाळ हा कंत्राटी कर्मचारी रॅकेटमध्ये सामील असल्याचे आढळून आले. डॉ. चव्हाण यांनी त्यास तत्काळ निलंबित केले. तर, सोमवारी (दि.१७) अंबाजोगाई येथील प्रवीण लॅबचा अभिजित सुधाकर सोळंके हा व्यक्ती एका रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेताना आढळून आला. त्यामुळे डॉ. चव्हाण यांनी सदरील लॅब आणि व्यक्तीच्या विरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रॅकेटची पाळेमुळे शोधून काढा

खेड्यापाड्यातील गोरगरीब रुग्णांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांना लुबाडणारे खासगी लॅबचालकांचे रॅकेट सर्व कोविड सेंटर्समध्ये सक्रिय आहेत. ज्या रुग्णांना कोणत्या वाॅर्डात जायचे, कोणाला भेटायचे हे माहीत नाही असे भोळेभाबडे गरीब रुग्ण हेरले जातात. त्यांची दिशाभूल करून आणि भीती घालून दलाल त्यांना खासगी रुग्णालयातून अव्वाच्या सवा दराने चाचण्या करण्यास भाग पाडतात. या रॅकेटची पाळेमुळे शोधून दलाल आणि सूत्रधारांना उघडे करून सर्वसामान्यांची लूट थांबवावी.

-अविनाश मोरे, सदस्य, जि. प.

या रुग्णालयातून कोरोना रुग्णांसाठी सिरम फिरॅटिन, एलडीएच, इंटरल्यूकिन-६, डी-डायमर या चाचण्या विनामूल्य उपलब्ध आहेत. आम्ही कोणत्याही खासगी लॅबकडे रक्त तपासणीसाठी देत नाही. जर कोणी दिशाभूल करून खासगी लॅबकडे पाठवत असेल तर त्वरित रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधावा.

-डॉ. चंद्रकांत चव्हाण, अधीक्षक, वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र, लोखंडी सावरगाव

Web Title: Activating racket to rob poor corona patients under the guise of blood test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.