कोरोनाला हरविण्यासाठी आडसकरांनी केली एकजूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:30 AM2021-04-26T04:30:17+5:302021-04-26T04:30:17+5:30
येथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. याला रोखण्यासाठी शुक्रवारी बैठक घेऊन दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय एकजुटीने ...
येथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. याला रोखण्यासाठी शुक्रवारी बैठक घेऊन दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय एकजुटीने घेण्यात आला.
आडस येथे गेल्या काही दिवसांपासून दररोज दहा ते बारा कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. या महिनाभरात कोरोना बाधितांचा आकडा २०० च्या पुढे गेला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. संसर्ग रोखण्यासाठी याची साखळी तोडणे आवश्यक आहे. यासाठी रमेश आडसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आडस येथे एक बैठक घेण्यात आली. यामध्ये सर्वानुमते गावात १० दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
या दहा दिवसांत लोकांना काही अडचण येऊ नये म्हणून सोमवारी सकाळी ११ पर्यंत किराणा आणि भाजीपाला मिळेल. त्याच दिवशी १० दिवस पुरेल अशी खरेदी करण्यात यावी. यानंतर आठ दिवस किराणा, भाजीपाला सर्व बंद राहणार आहे. शेतात कामाला जाणाऱ्यांशिवाय विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ठरले. त्यामुळे ग्रामस्थांनी गावाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी १० दिवस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. या बैठकीला ऋषिकेश आडसकर, भागवत नेटके, बालासाहेब ढोले, शिवरुद्र आकुसकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा केकाण, महसूल मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पोलीस आदींची उपस्थिती होती.
५० बेडचे कोविड सेंटर होणार
आडस येथील वाढते कोरोना रुग्ण आणि केज, अंबाजोगाई येथील वाढती गर्दी पाहता आडस येथे ५० बेडचे कोविड सेंटर सुरू करावे. त्याचे सर्व नियोजन करण्याची हमी रमेश आडसकर यांनी दिली. तालुका प्रशासनाने याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत तहसीलदारांनी याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविला आहे. त्यास मंजुरी येताच दोन दिवसांत कोविड सेंटर सुरू होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.