बीडच्या सुधारीत पाणीपुरवठा योजनेस अतिरिक्त विद्युत भार मंजूर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:39 AM2021-09-04T04:39:47+5:302021-09-04T04:39:47+5:30
बीड : अमृत अभियानअंतर्गत सुधारीत बीड पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. बीड शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी पिंपळगाव मंजरा व ...
बीड : अमृत अभियानअंतर्गत सुधारीत बीड पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. बीड शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी पिंपळगाव मंजरा व काडीवडगाव या ठिकाणी पंपिंग स्टेशन आहे. यासाठी अतिरिक्त विद्युतभार मंजूर करावा, तसेच बीड शहरात अनेक ठिकाणी पथदिव्यांसाठी पाचवी तार बसवण्यात आली नाही, ती तत्काळ बसवण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे गुरुवारी केली.
मांजरा व काडीवडगाव येथे नवीन योजनेअंतर्गत दोन्ही ठिकाणी नवीन पंप बसविण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता अतिरिक्त विद्युत भार मंजुरीसाठी म.जी.प्रा. बीड यांनी अधीक्षक अभियंत्याकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे. परंतु महावितरण बीड कार्यालयाकडून अतिरिक्त विद्युत भार मंजुरीसाठी थकबाकी भरण्याची कार्यवाही करावी, असे कळविले आहे. एकूण वीजबिलाचे अवलोकन केल्यावर एकूण थकबाकीपैकी दोन्ही ठिकाणांवरील एकूण व्याजाची रक्कम रु. १३ कोटी ४७ लाख १६ हजार ४०० एवढी आहे व मूळ थकबाकीची रक्कम जवळपास कोट्यवधीच्या घरात आहे. मागील वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नगर परिषदेची वसुली ठप्प आहे. सन २०२०-२१ मधील सर्व महिन्यांची वीज देयके न.प. मार्फत अदा करण्यात आलेली आहेत. तसेच थकबाकीच्या २ टक्केप्रमाणे ५० लक्ष रक्कम अदा केलेली आहे. थकबाकी एकरकमी भरणे नगर परिषदेस शक्य नाही. नगर परिषद मूळ थकबाकी टप्प्याने भरण्यास तयार आहे व थकबाकीवरील व्याज भरणे न.प.स. शक्य नाही तरी सदरील थकबाकीवरील व्याज माफ करावे, अशी मागणीही जयदत्त क्षीरसागर यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे. यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.