देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिरात उदयापासून अधिक मास उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 05:04 PM2023-07-17T17:04:21+5:302023-07-17T17:05:00+5:30

महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत देशभरातील लाखो भाविक दर्शनाला येणार असल्याने त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर संस्थानच्यावतीने जय्यत तयारी सुरु आहे.

Adhik mahina celebrations from tomorrow in the country's only Purushottam temple | देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिरात उदयापासून अधिक मास उत्सव

देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिरात उदयापासून अधिक मास उत्सव

googlenewsNext

- पुरूषोत्तम करवा
माजलगाव:
तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीकाठी तेराव्या शतकातील हेमाडपंती बांधकाम असलेले भगवान विष्णूचा अवतार  पुरुषोत्तमाचे देशातील एकमेव मंदिर आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात ( धोंड्याचा महिना ) पुरुषोत्तमाच्या दर्शनाचे महात्म्य असल्याने या गावास वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. या अधिक मासास मंगळवारी प्रारंभ होत आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते शासकीय महापुजेने उत्सवास प्रारंभ होईल. महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत देशभरातील लाखो भाविक दर्शनाला येणार असल्याने त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर संस्थानच्यावतीने जय्यत तयारी सुरु आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीकाठी पुरुषोत्तमपुरी हे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे गोदावरीकाठापासून अलीकडे शंभर मीटर अंतरावर तेराव्या शतकात राजा रामदेवराय यांच्या काळात विष्णूचा अवतार - भगवान पुरुषोत्तमाचे हेमाडपंती मंदिर दगड -विटांनी बांधलेले आहे. या बांधकामातील विटा पाण्यावर तरंगतात हे आश्चर्य आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून आतील गाभाऱ्यात गंडकी शिळेची  भगवान पुरुषोत्तमाची उभी मूर्ती, हाती शंख-चक्र-गदा-पद्म धारण केलेली तीन फूट उंचीची आहे. 

पुरातन काळात या परिसरात दंडकारण्य होते. तेथे शार्दूल नावाचा राक्षस रयतेला त्रास देत असे. भगवान विष्णूने पुरुषोत्तमाचा अवतार धारण करून आपल्या हातातील चक्राने राक्षसाचा वध केला व ते चक्र गोदावरी नदीत धुऊन काढल्याने या तीर्थाला चक्रतीर्थ असे नाव पडले. आजही मंदिरापासून समोरच गोदावरी नदी व चक्रतीर्थाचे सुंदर व विलोभनीय अशा दृश्याचे दर्शन होते. 

'धोंडे महात्म्य ' या पवित्र ग्रंथात उल्लेखलेल्या बारा महिन्यांना बारा भगवंत स्वामी आहेत. मात्र सर्वांचा मिळून बनलेल्या अधिक मासाचे स्वामित्व कोणीच स्वीकारत नसल्याने ते पुरुषोत्तमाने स्वीकारले. त्यामुळे दर तीन वर्षांनी येणारा अधिक मासात ( धोंड्याचा महिना ) पुरुषोत्तम दर्शनास महत्त्व आहे.  या मंदिराच्या बाजूसच महादेवाचे मंदिर आहे. येथे वरद विनायक गणपतीची चार फूट उंचीची मूर्ती, माता पार्वतीच्या पादुका व महादेवाची पिंड असा त्रिवेणी संगम आहे. आता ही दोन्ही ही मंदिरे जीर्णोद्धारासाठी पाडलेली असून या मूर्तीचे पत्र्याच्या शेडमध्ये दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
अधिकमासामध्ये संपूर्ण महिनाभर देशातील विविध भागातून ५ ते ६ लाख भाविक गर्दी करतात. परिवहन मंडळाच्या बस, ट्रॅव्हल्स, खाजगी वाहनांनी भाविक येतात. दर्शनासाठी पावसाचा त्रास होऊ नये म्हणून ९० बाय ७० आकाराचे दिड हजार भाविक थांबू शकतील असे शेड उभारण्यात आले आहे. तुळजाभवानी मल्टिस्टेटच्या वतीने चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी पिण्याचे दररोज एक हजार जारची व्यवस्था मोफत केली आहे.

धोंडे अर्पण करण्याची आहे परंपरा
भारतीय सांस्कृतित धोंड्याच्या महीन्याला अनन्यसाधारण महत्व असून या महिन्यात सौभाग्यवती स्त्रिया गोदावरीत स्नान करुन पतीच्या दिर्घआयुष्यासाठी पुरुषोत्तमाला ३३ असे धोंडे अर्पण करतात. त्यात अनेक जण कुवतीप्रमाणे एक सोन्याचा, चांदीचा तर बाकी पुरणाचे धोंडे वाहतात.

निझाम राजवटीत होते मानाचे स्थान
निझाम राजवटीत या स्थानाला फार मोठा मान होता. या संस्थानला शेकडो एकर जमिनी, मालमत्ता तात्कालीन राजवटीने प्रधान केल्या होत्या. माञ अनेक मालमत्ता वहीतीदाराने बळकवल्याचे सांगितले जाते. मंदीरासंबंधी तीन ताम्रपट उस्मानिया विद्यापीठ हैद्राबाद येथे जतन करुन ठेवण्यात आले आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे त्याचे भाषांतर, प्रकाशन, रेकाँर्डींग केले असून त्यात या पौराणिक स्थळाचे महत्व विशद करण्यात आले आहे.  

रस्त्याकडे राज्यकर्त्याचे दुर्लक्ष !
तालुक्याला एवढा मोठा पुरातन वारसा असतांना येथील राज्यकर्त्यांना येथील रस्त्याचा प्रश्न सोडवता आला नसून दरवर्षी त्यांना अधिक मासातच भगवान पुरुषोत्तमाची आठवण येते.अरुंद व उखडलेल्या रस्त्यामुळे येणाऱ्या भाविकांना वाहतुक कोंडीचा व गैरसोयीचा सामना करावा लागु शकतो.

जीर्णोद्धाराचे काम युद्धपातळीवर
या पुरातन मंदिराचा ठेवा जतन करण्यासाठी  व त्यास संवर्धनासाठी मदत मिळण्यासाठी माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली. त्यांनी या गोदकाठच्या सुंदर अशा मंदिरास ५४.५६ कोटी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर या कामाने वेग घेतला असून आता मंदिराचे पुरातन रूप जतन करून आहे. तसेच मंदिर नवीन रुपात बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ६.८५ कोटी रुपयांच्या कामात भगवान पुरूषोत्तम व सहालक्षेश्वर मंदिर पाडकाम व पुनर्बांधणी, वावऱ्या, भक्तनिवास या कामांचा समावेश आहे. या मंदिरांचे दगडी बांधकाम चुण्यामध्ये करण्यात येणार आहे.

कसे जाल : 
माजलगावपासून कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय  महामार्गावर असलेल्या सावरगाव फाट्यावरून १२ किमीवर पुरुषोत्तमपुरी गाव आहे. 

Web Title: Adhik mahina celebrations from tomorrow in the country's only Purushottam temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.