पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासन बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:33 AM2021-04-16T04:33:57+5:302021-04-16T04:33:57+5:30
गेवराई : तालुक्यातील कोळगावसह परिसरातील दहा ते बारा गावात बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच मोठ्या प्रमाणात गारपीट झाली ...
गेवराई : तालुक्यातील कोळगावसह परिसरातील दहा ते बारा गावात बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. परिणामी शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान नुकसान झालेल्या पिकांचे गुरुवारी महसूल प्रशासनाच्या आदेशानुसार कोळगाव परिसरात तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यकांनी सतर्कता दाखवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली.
मागील दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले राहिले आहे. यामुळे रब्बी हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन घेत आहेत. कोळगाव, तांदळा, सुशी, वडगाव, बंगाली-पिंपळा, सावरगाव,साठेवाडी आदी दहा ते बारा गावातील परिसरात रब्बी हंगामातील पिकांचा मोठ्या पेरा झालेला असून ही पिके शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली असतानाच या परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, पाऊस तसेच मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने कांदा, गहू, हरभरा, मका, ज्वारी, खरबूज, टरबूज, काकडी आदी पिकांसह आंबा, चिकू, जांब आदी फळबागांसह भाजीपाल्यांचे गारपिटीने अतोनात नुकसान झाले.
दरम्यान तहसील प्रशासनाच्या आदेशानुसार गुरुवारी सकाळी कोळगावसह परिसरात तलाठी डी.ए.शेळके, कृषी सहाय्यक सानप, ग्रामसेवक घोलप यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संयुक्तिक गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. तसेच या भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी करुन शेतकऱ्यांना धीर दिला. तर शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी शिक्षण सभापती पंढरीनाथ लगड, सरपंच उद्धव रासकर, लक्ष्मणराव हिंदोळे, रमेश मुंगसे, राहुल रासकरसह शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान मोठे आहे. तरी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन हा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.
डी .ए. शेळके तलाठी, कोळगाव
गारपीट झालेल्या गावात संबंधितांना तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांच्याकडून अहवाल प्राप्त होताच तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल.
सचिन खाडे
तहसीलदार, गेवराई
गेवराई - कोळगाव येथील जालिंदर जोगदंड यांच्या शेतातील कांदा पिकाचा पंचनामा करताना तलाठी डी. ए. शेळके सह आदी.
===Photopath===
150421\img-20210415-wa0349_14.jpg~150421\img-20210415-wa0351_14.jpg