माजलगावात प्रशासन बेफिकीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:32 AM2021-05-16T04:32:31+5:302021-05-16T04:32:31+5:30
माजलगाव : कोरोना रोखण्यासाठी शासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचे आदेश असताना शुक्रवारी व शनिवारी हा आदेश धुडकावून माजलगाव शहरात ...
माजलगाव : कोरोना रोखण्यासाठी शासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचे आदेश असताना शुक्रवारी व शनिवारी हा आदेश धुडकावून माजलगाव शहरात मोंढ्यात चक्कपणे सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवली, तर मुख्य रस्त्यावर व विविध भागांत दुकाने दिवसभर बिनदिक्कतपणे सुरू असल्याने रस्त्यावर लोकांची मोठी वर्दळ दिसून येत होती. असे असताना येथील प्रशासन बेफिकीर असल्याने नियम धाब्यावर बसवण्यात आले त्यामुळे कोरोना कसा आटोक्यात येणार? असा प्रश्न पडला आहे.
कोरोना रोखण्यासाठी विविध प्रतिबंध घालत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला फक्त रमजान ईदनिमित्त ११ व १२ तारखेस किराणा, ड्रायफ्रूट, मटण दुकाने यांना ७ ते १० वेळेत परवानगी देण्यात आली होती. तरीही हा आदेश धुडकावून शुक्रवारी व शनिवारी सर्व बाजारपेठ उघडली. परंतु शहरात तहसील प्रशासन बेफिकीर असल्याने लॉकडाऊनचा फज्जा झाला आहे. लोक खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत व त्यांना हव्या त्या वस्तू दुकानदार दुकाने उघडून देत आहेत, असा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. मोठी कापड दुकाने शटर वर करून ग्राहकांना आत प्रवेश देतात व पुन्हा शटर बंद करतात, खरेदी झाल्यावर ग्राहकांना बाहेर सोडतात. अशा पद्धतीने काही दुकानांत लग्नाचे बस्तेदेखील विक्री होत आहेत. याबाबत पोलिसांना माहिती देऊनही पोलीस गप्प बसण्याची भूमिका घेत आहेत हे विशेष. शहरातील धारूररोडवर चहाची हॉटेल्स सर्रासपणे सुरू आहेत येथे तर सतत मोठी गर्दी असते. याच रस्त्यावर सर्व्हिसिंग सेंटरवर तर सर्रास वाहने धुण्यात येत आहेत. मोंढ्यातदेखील अनेक दुकानांबाहेर मालक उभे राहून ग्राहक आला की त्यास पाहिजे ते साहित्य काढून देत असल्याचे चित्र दिसून येत होते, तर लोकदेखील बिनधास्तपणे रस्त्यावर दिवसभर पायी व दुचाकीवर फिरताना दिसून येत होते. मुख्यतः व्यापाऱ्यांनीच लॉकडाऊन धुडकावून चक्क दुकाने सुरू केल्यानंतर याबाबतीत पोलिसांना व नगर परिषद कर्मचारी यांना गांभीर्य नसल्याने लॉकडाऊन नावालाच सुरू असल्याचे बोलले जात आहे.
-----
लॉकडाऊन सुरळीत चालू ठेवण्यासाठी एखादी-दुसरी वेळ सोडली, तर तहसीलदार वैशाली पाटील कधीच रस्त्यावर दिसल्या नाहीत. तसेच त्यांनी नियुक्त केलेले महसूल, पोलीस, नगर परिषदेची पथके कोठे आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये तत्कालीन तहसीलदार प्रतिभा गोरे या सतत रस्त्यावर उतरून लॉकडाऊनचे तंतोतंत पालन होईल यासाठी चोवीस तास कार्यरत असायच्या याची आठवण नागरिकांना येत आहे.