पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाची आडमुठी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:09 AM2019-04-29T01:09:48+5:302019-04-29T01:11:29+5:30

काही ठिकाणी पाणी उपसा होत असल्याने आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना असताना पाटबंधारे विभागाकडून महावितरणच्या मदतीने विद्यूत पुरवठा खंडित केला जात आहे

The administration's contraversial role to prevent water logging | पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाची आडमुठी भूमिका

पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाची आडमुठी भूमिका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तसेच सर्व तलाव, गोदावरी नदी व इतर पाणी पुवठा करणाऱ्या ठिकाणावरुन पाणी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी पाणी उपसा होत असल्याने आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना असताना पाटबंधारे विभागाकडून महावितरणच्या मदतीने विद्यूत पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना वेळोवेळी वीज खंडित होत असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
गोदापट्टा किंवा जलसाठवण तलाव तसेच इतर मोठ्या प्रकल्पातून पाणी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरी देखील काही ठिकाणी मोटारी टाकून ऊस व इतर बागायती पिकांना पाणी दिले जात आहे. त्यांच्या मोटारी जप्त करुन कारवाई करण्याऐवजी महावितरणकडून विद्यूत पुरवठा खंडित करुन पाणी उपसा रोखण्याचा फसवा प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून केला जात आहे. मात्र, याचा फटका सामान्य शेतक-यांना बसत असल्याचे गेवराई, माजलगाव, धारुर व इतर गोदाकाठावरील शेतक-यांकडून सांगण्यात आले. या परिसरात अनेक शेतक-यांच्या वहिरींना व बोअरला थोडेफार पाणी शिल्लक आहे. या पाण्यावर शेतकरी आपल्या जनावरांना पाणी पाजतात, तसेच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पाणी वापरले जाते. परंतु विद्यूत पुरवठा खंडित केल्यामुळे पाणी उपसा करता येत नाही.
गेवराई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडले जाते. हे पाणी गोदापात्रातून शहागड बंधाºयात येते. मात्र, या पाण्याचा शेतकरी उपसा करतात अशी भूमिका घेत नगरपालिकेने पाटबंधारे विभाग आणि महावितरण यांच्यावर दबाव वाढविला आहे. पाण्याचा विनापरवाना उपसा होत असेल तर अशा मोटारी जप्त करणे अथवा कारवाई अपेक्षित आहे. संबंधित कार्यालयांकडून महावितरणला हाताशी धरून या परिसरातील वीजपुरवठाच खंडित ठेवण्याची नवी शक्कल लढवली जात आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतक-यांना बसत आहे. तात्काळ हा वीजपुरवठा खंडित करण्याचा खेळ थांबवा अन्यथा सर्व संबंधित कार्यालयांवर आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील गोदाकाठावरील शेतक-यांनी दिला आहे.
मागील ५ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित
गोदाकाठच्या गावांचा वीज पुरवठा मागच्या ४ ते ५ दिवसांपासून सातत्याने बंद करण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिका-यांना विचारल्यास ‘आम्हाला पाटबंधारे विभागाने पत्र दिले आहे’ असे सांगून अधिकारी मोकळे होतात.
वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतक-यांना स्वत:च्या विहिरीतून पाणी काढून जनावरांना पाणी कसे पाजायचे हा प्रश्न पडला आहे.
गावात टँकरला दूषित पाणी येते. मग घरी माणसांना पिण्यासाठी पाणी कोठून न्यायचे असे अनेक प्रश्न शेतक-यांसमोर उभा राहिला आहे.

Web Title: The administration's contraversial role to prevent water logging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.