प्रशासनाच्या गलथान कारभाराने केजमध्ये भरला बाजार - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:16+5:302021-07-01T04:23:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक नियम लागू केले असताना केज येथील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे केज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक नियम लागू केले असताना केज येथील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे केज शहरातील मंगळवार पेठेत सकाळीच बाजार भरल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. मात्र दुपारी बाराच्या सुमारास नगर पंचायतीच्या काही कर्मचाऱ्यांनी बाजार उठविण्यास सुरुवात केली. मात्र भरलेला आठवडी बाजार उठविताना कर्मचाऱ्याच्या नाकी नऊ आल्याचे चित्र दिसून आले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात व जिल्ह्यात कडक नियमावली लागू करण्यात आली असली तरी या कडक नियमावलीची अमलबजावणी केज येथील प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी करीत नसल्याने केज शहरातील मंगळावर पेठेत मंगळवारी सकाळीच मंगळवारचा आठवडी बाजार भरला होता. बाजारात भाजीपाला, किरकोळ विक्रेते यांसह अन्य विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटली होती; तर तालुक्यातील आसपासच्या गावांतील नागरिकांनी बाजार करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी बाजार भरत असताना केज येथील प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी झोपलेले होते. मात्र बाजार गर्दीने फुलू लागताच त्यांना जाग आल्याने केज नगर पंचायतीचे काही कर्मचारी, दोन होमगार्ड व एक पोलीस कर्मचारी यांनी भरलेला बाजार उठविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र बाजारात ठाण मांडून बसलेल्या विक्रेत्यांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. बाजार बंद करायचा होता तर शुक्रवारच्या बाजारात आम्हाला माहिती का दिली नाही, असा सवाल ते करीत होते. विक्रेते बाजारातून उठत नसल्याने काही ठिकाणी नगर पंचायत कर्मचारी व होमगार्ड व पोलिसांनी भाजीपाला उचलून घेत बाजार बंद करण्याचा प्रयत्न केला असल्याचे चित्र दिसून आले. कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासह येणाऱ्या तिसऱ्या लाटेत नागरिकांना संसर्ग होऊ नये यासाठी शासन व प्रशासन कडक नियम लागू करीत असताना या नियमांची अंमलबजावणी मात्र केज शहरात प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी करीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
===Photopath===
290621\1350img_20210629_103753.jpg
===Caption===
केज शहरातील मंगळवार पेठेत भरलेला आठवडी बाजार उठवताना नगर पंचायतचे कर्मचारी.