वैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:30 AM2021-01-21T04:30:14+5:302021-01-21T04:30:14+5:30
अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांचे नागरिकासह तहसील कार्यालयासमोर आंदोलन लोकमत न्यूज गेवराई तालुक्यातील ...
अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांचे नागरिकासह तहसील कार्यालयासमोर आंदोलन
लोकमत न्यूज गेवराई
तालुक्यातील गोदापात्र व सिंदफना नदी पट्ट्यात रात्री-अपरात्री हायवा व ट्रॅक्टरमधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत आहे. यामुळे या भागातील या अवजड वाहनाने खराब होत आहे. याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याने, या विरोधात भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी गोदा पट्ट्यातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
गेवराई तालुक्यात गोदापत्रातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीबाबत आ.लक्षण पवार यांनी दि.१३ जानेवारी रोजी प्रशासनाला निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. याबाबत प्रशासनाने कुठलीही दखल ना घेतल्याने, त्यांनी मंगळवारी उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले होते की, दि. ४ जानेवारी रोजी राक्षसभुवन रोडवरील गंगावाडी येथील रुस्तुम मते यांना वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगात हायवाने चिरडल्याने यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून, या दुर्दैवी घटनेने गोदा पट्ट्यातील ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने या प्रकरणात गाडी जप्त करून संबंधित वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून, विशेष म्हणजे सदरील वाहनाचा मालक पोलीस कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे. या आधीही वाळूने भरलेल्या वाहनांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत, तरी प्रशासन कोणतीही कठोर पावले उचलल्याचे निदर्शनात आले नाही. त्यामुळे गोदा पट्ट्यातील होणारा अवैध वाळू उपसा कायमचा बंद करण्यात यावा, वाळू तस्करी करणाऱ्यावर कठोर निर्बंध घालावेत, वाळू लिलावाचे टेंडर तातडीने करून किचकट टेंडर प्रक्रिया सुलभ करून, त्याचे दर कमी करण्यात यावेत, असे केल्याने अवैध वाळू तस्करी व चोरीवर नियंत्रण ठेऊन वाहने रात्री-अपरात्री भरधाव वेगाने धावणार नाहीत. इतक्या वर्षात गोदाकाठच्या वाळूचे लिलाव झालेले नाही, त्यामुळे सहा वर्षांत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. वाळू लिलावाचे अपसेट प्राइस जास्तीचे असल्यामुळे लिलाव टेंडर घेण्यास संबंधित गुत्तेदार धजावत नाहीत, त्यामुळे ही अपसेट प्राइस कमी करावी, जिल्हाधिकारी स्तरावर महसूल व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या स्पेशल टास्क फोर्स निर्माण करावा व त्यामध्ये माजी सैनिकांना सामावून घ्यावे, टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करून वाळू तस्करी व साठा करणाऱ्यावर धाडी टाकाव्यात, वाळू तस्करांना रात्री-अपरात्री मोबाइलद्वारे अपडेट माहिती देणाऱ्या महसूल व पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे मोबाइल संभाषण तपासून दोषींवर कारवाई करावी, गंगावाडी प्रकरणात तलाठी निलंबित करण्यात आला आहे. मात्र, पोलीस अंमलदार यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तसेच गेवराई मतदार संघात असलेल्या गोदावरी सिंदफना नदी पट्ट्यातील वाळू वाहतूक व उत्कलनाबाबत असलेले नियम अपसेट प्राइससंदर्भात तातडीने मंत्रालयात सचिव स्तरावर बैठक घेण्यात यावी, यासह आदी मागण्या घेऊन आ.लक्ष्मण पवार यांनी गोदावरी व सिंदफना पट्ट्यातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी आ.लक्ष्मण पवार, भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश काका सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, सभापती दीपक सुरवसे, उपसभापती संदीप लगड, जि.प.सदस्य पांडुरंग थडगे, पंचायत समिती सदस्य प्रा.शाम कुंड, सरपंच ॲड.उद्धव रासकर, समाधान मस्के यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे.
चौकट -
सायंकाळी उपोषणस्थळी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी भेट देऊन आ.पवार यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली, तसेच वाळू बाबतीत निवेदनात दिलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी सचिवांशी बोलून वेळ मागवून घेत असल्याचे एसडीएम नामदेव टिळेकरांनी सांगितले असता, सचिवांनी शब्द डावलला, तर मंत्रालयासमोरच उपोषण करण्याचा इशारा आ.पवार यांनी यावेळी दिला.