अंबाजोगाई बाजार समितीवर पुन्हा प्रशासक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:30 AM2021-04-19T04:30:49+5:302021-04-19T04:30:49+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहायक निबंधक व्ही. एल. पोतंगले यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली ...
अंबाजोगाई :
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहायक निबंधक व्ही. एल. पोतंगले यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक आर. एम. मोटे यांनी हे आदेश जारी केले.
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांची (संचालक मंडळाची) नियत मुदत २९ सप्टेंबर २०२० रोजी संपुष्टात आल्यामुळे या कार्यालयाचे आदेश संदर्भ क्र.२ अन्वये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदरचे प्रशासक नियुक्ती आदेशास बाजार समितीने उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्र. ६९१३/२०२० दाखल करून आव्हान दिले होते. ही याचिका न्यायप्रविष्ट असताना दरम्यानच्या कालावधीत उपसचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय मुंबई यांनी संदर्भ क्र. ३ अन्वये कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबाजोगाई, जि. बीड या बाजार समितीवर गोविंद बाळासाहेब देशमुख, मुख्य प्रशासक व इतर ९ सदस्य यांचे अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्तीस मान्यता दिली होती. या मान्यतेच्या अनुषंगाने बाजार समितीवर अशासकीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केलेली होती.
कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबाजोगाईच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपलेली असल्याने व शासनाने मुदतवाढ देण्याचे नाकारल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करणे क्रमप्राप्त झाले होते. त्यामुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १५ (अ) १ (अ) मधील तरतुदीनुसार जिल्हा उपनिबंधक आर. एम. मोटे यांनी सहायक निबंधक व्ही. एल. पोतंगले यांची प्रशासक म्हणून सहा महिन्यांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत नियुक्ती केली आहे, तर या आदेशानुसार अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व समिती सदस्य या आदेशाच्या तारखेपासून त्यांची सदस्य म्हणून किंवा अन्यथा असलेली पदे धारण करण्याचे बंद होईल व ती पदे रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.