कौतुकास्पद ! १२३३ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 07:56 PM2020-08-14T19:56:33+5:302020-08-14T19:56:53+5:30
बाहेरून आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासह प्रशासनाच्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी
- सोमनाथ खताळ
बीड : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील १२३३ गावांनी अद्यापही कोरोनाला वेशीवरच रोखून धरले आहे. ही सर्व गावे अद्यापही कोरोनामुक्त आहेत. ११ शहरे आणि १६९ गावांत आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुक्त असलेल्या गावांचे प्रशासनाकडून कौतूक केले जात आहे.
जिल्ह्यात १ हजार ३१ ग्रामपंचायत आहेत. तर जिल्हा परिषदेतील पंचायत विभागाच्या माहितीनुसार एकूण गावांची संख्या १४०२ आहे. पैकी १६९ गावे आणि तालुक्याच्या ११ शहरांमध्ये कोरोनाने प्रवेश केला आहे. आतापर्यंत प्रशासनाने ५८९ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करून त्याठिकाणी सर्वेक्षण केले आहे. ५८९ पैकी ४२८ ठिकाणे ही शहरातील विविध भागातील आहेत.
दरम्यान, राज्यासह मराठवाड्यात कोरोनाचे रुग्ण सापडत असताना बीड जिल्हा कोरोनामुक्त होता. सुरूवातीला जिल्ह्याच्या सिमेवर कोरोनाला रोखले. ८ एप्रिल रोजी आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर महिनाभर पुन्हा जिल्हा कोरोनामुक्त राहिला. नंतर मुंबईहून परतलेल्या कुटूंबातील १४ वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार रूग्णांचा टप्पा ओलांडला आहे. रोज १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे.
ज्या गावात अद्यापही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, त्या गावांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासह मास्क वापरून सोशल डिस्टन्सिंग ठेवले. एकमेकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यासह जनजागृती करून ग्रामस्थांना सतर्कही केले आहे. याचाच फायदा या गावाला आणि ग्रामस्थांना झाला आहे. त्यामुळेच अद्यापही जिल्ह्यातील १२३३ गावे कोरोनामुक्त राहिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह टिमने या गावांना वेळोवेळी सूचना करून काळजी घेण्याबाबत आवाहन केले. तसेच गावात आल्यावर पोलीस, आरोग्यासह प्रशासनाच्या प्रत्येक विभागाला ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे.
कोरोनामुक्त गावे
माजलगाव तालुक्यातील पात्रूड, तालखेड, गंगामसला अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर, बर्दापूर, आपेगाव, लोखंडीसावरगाव, ममदापूर पाटोदा, धानोरा, उजणी, मुडेगाव गेवराई तालुक्यातील तलवाडा, जातेगाव, पाडळसिंगी पाटोद्यातील कुसळंब यासह १२३३ गावे कोरोनामुक्त आहेत.
नेमके काय केले?
1. सुरूवातीच्या काळात बाहेरून येणाऱ्यांना गावबंदी केली. यासाठी रस्ते, पाऊलवाटा बंद करण्यात आल्या होत्या
2. ग्राम सुरक्षा समिती स्थापन केली. गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर एक सदस्य पहारा देत होता.
3. बाहेरून आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासह त्यांना सुविधा पुरविणे व लक्ष ठेवण्याचे काम गावात झाले.
4. कोरोना आजाराची जनजागृती करण्यासह लोकांना काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.
5. हायड्रोक्लोरो -फाईडची गावात फवारणी करण्यात आली. तसेच स्वच्छता केली. ग्रामस्थांना सुचनाही केल्या.
6. गावात गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले. तसेच गर्दी केल्यानंतर ती पांगविण्यात आली.
7. पोलीस, आरोग्य, महसुल विभागाचे लोक आल्यास त्यांना सहकार्य केले.
8. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे वेळोवेळी पालन केले. नियमांचे उल्लंघण टाळले.
9. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यास दम दिला. कारवाईच्या इशाराबरोबरच पोलिसला माहिती.
10.तरूण, युवकांनी एकत्र येत ग्रामस्थांना आवाहन व सुचना करून जनजागृती केली.
आरोग्य केंद्रांचा आधार
जिल्ह्यात ५१ प्राथमिक व २७० पेक्षा जास्त उपकेंद्र आहेत. कोरोनाकाळात ग्रामीण भागात आरोग्य केंद्राची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. बाहेरून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करणे, सर्वेक्षण करणे, त्यांची तपासणी करणे, संशयितांना रेफर करण्याचे काम त्यांनी केले आहे. वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या टिमचे काम स्वागतार्ह आहे.
कर्तव्यात तत्परता
ग्रामीण भागात आशासेविका आणि अगंणवाडी तार्इंनी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले आहे. उन्हाळा असतानाही या महिलांनी सर्वेक्षण पूर्ण केले. तसेच बाहेरून आलेल्यांची माहिती घेऊन गावात तत्परता दाखविली. कोरोनाग्रस्त रुग्ण शोधण्याची खरी जबाबदारी यांनी पार पाडली आहे. डॉक्टर, परिचारिकांप्रमाणेच त्याही या लढ्यातील योद्धा ठरल्या.
इतरांनी बोध घ्यावा
बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन करण्यासह दिलेल्या सुचनांची प्रभावी अंमलबजावणी केली. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सींग ठेवण्याबाबत त्यांनी काळजी घेतली. या गावांनी जसे सुचनांचे योग्य पालन करून गाव कोरोनामुक्त ठेवले, त्याचा आदर्श इतर गावे व पालिका, नगर पंचायतींनी घेणे आवश्यक आहे. या गावांचे प्रशासनाकडून स्वागत करतो.
- अजित कुंभार, सीईओ, जि.प.बीड
८ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला
2252सध्याचे रुग्ण
58जणांचा आतापर्यंत मृत्यू
885जणांची कोरोनावर मात
1402जिल्ह्यातील एकूण गावे
3,43,000नागरिक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध गावांवरुन जिल्ह्यात वेगवेगळ्या गावांमध्ये आले.