ई-पास असेल तरच बीड जिल्ह्यात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:02+5:302021-05-21T04:35:02+5:30
आष्टी। प्रतिनिधी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता राज्यामध्ये १ जूनपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ...
आष्टी। प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता राज्यामध्ये १ जूनपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. मात्र तरीही नागरिकांचे प्रवास करण्याचे प्रमाण मोठे आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात प्रवेश होणाऱ्या अंभोरा हद्दीत चेकपोस्ट करण्यात आले आहे. तसेच नाकाबंदी करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे स्वतः वाहनांची कसून तपासणी करत आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन ई-पास असेल तरच बीड जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.
राज्य सरकारने कडक निर्बंध जाहीर करून जिल्हाबंदी केलेली आहे. त्यामुळे नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नाही. मात्र अंत्यसंस्कार, वैद्यकीय कारण असणाऱ्यांसाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अहमदनगर, बीड जिल्ह्याच्या सीमेवर अंभोरा हद्दीत चेकपोस्ट सुरू करण्यात आली असून बॅरिकेट लावून ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. जिल्हा हद्दीत ई-पास असेल, अत्यावश्यक काम असेल तरच प्रवेश दिला जात आहे. अन्यथा इतर वाहनांना जिल्ह्यात प्रवेश बंद करण्यात आला आहे. मास्क तपासणी, कोरोना टेस्टची विचारणा करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी अंभोरा चेकपोस्टवर कसून तपासणी करून ई-पास असेल, अत्यावश्यक काम असेल तरच पोलीस प्रवाशांना प्रवेश देत आहेत.
दररोज १०० जणांवर कारवाई
कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा, विनामास्क, व्यावसायिकांचे दुकाने सुरू असणारे, सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्यास दररोज अंभोरा पोलीस १०० ते १५०पर्यंत दंडात्मक कारवाई करत आहेत. अंभोरा चेकपोस्टवर १ अधिकारी, १ कर्मचारी, २ होमगार्ड, २ शिक्षक तैनात आहेत.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
ई-पास, अत्यावश्यक काम याबाबत कसून चौकशीनंतरच जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करावे. उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर, प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- ज्ञानेश्वर कुकलारे, सहायक पोलीस निरीक्षक, अंभोरा
===Photopath===
200521\img-20210520-wa0168_14.jpg