परिचारीकांना धक्काबुक्की करणारा आरोपी अखेर १३ दिवसांनी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 05:06 PM2019-05-02T17:06:35+5:302019-05-02T17:07:55+5:30
आरोपी फरार असल्याने परिचारीका, डॉक्टर दहशतीखाली होते.
बीड : जिल्हा रूग्णालयातील परिचारीकांना धक्काबुक्की करणाऱ्या आरोपीस अखेर १३ दिवसांनी गजाआड करण्यात आले आहे. आरोपी फरार असल्याने परिचारीका, डॉक्टर दहशतीखाली होते. हीच बाब लोकमतने समोर आणली होती. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी बीड शहर पोलिसांची चांगलीच कानवउघडणी केली. त्यानंतर शहर पोलिसांची धावपळ सुरू झाली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.
शेख समिर शेख नजीर (३४ रा.मोमीनपुरा पेठबीड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. १७ एप्रिल रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शेख समीरने जिल्हा रूग्णालयातील परीचारीकांना धक्कबुक्की व शिवीगाळ केली होती. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. १० दिवस उलटल्यानंतरही आरोपी मोकाटच होता. बीड शहर पोलिसांकडून त्याला अभय दिले जात असल्याची चर्चा होती. हाच धागा पकडून लोकमतने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी वृत्ताची गंभीर दखल घेत बीड शहर पोलिसांची चांगलीच कानउघडणी केली. त्यानंतर शहर पोलीस खडबडून जागे झाले. अखेर डीबी पथक क्र.२ ने १ मे रोजी मोमीनपुरा भागात त्याला सकाळी बेड्या ठोकल्या. ही कारवाई डीबीचे एएसआय जहूर शेख, पोना महेश जोगदंड, झुंबर गर्जे, असलम पठाण आदींनी केली.
दरम्यान, त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याची कोठडीत रवानगी केली आहे. जप्त करण्यासाठी काहीच नसल्याने त्याला पोलीस कोठडी मागितली नसल्याचे तपास अधिकारी पोउपनि एस. जाधव यांनी सांगितले.