आत्महत्येचा प्रयत्न फसल्यानंतर अट्टल गुन्हेगाराचे बीड जिल्हा रुग्णालयातून पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:13 PM2018-03-26T22:13:02+5:302018-03-26T22:13:02+5:30
आठ दिवसांपूर्वी जिल्हा कारागृहातून पलायनाचा प्रयत्न फसल्यानंतर रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात जाऊन काचाने गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यातूनही बचावल्यानंतर सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून अट्टल गुन्हेगार ज्ञानोबा बालाजी जाधव (रा. रूपचंद नागर तांडा, जि. लातूर) याने पलायन केले.
बीड : आठ दिवसांपूर्वी जिल्हा कारागृहातून पलायनाचा प्रयत्न फसल्यानंतर रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात जाऊन काचाने गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यातूनही बचावल्यानंतर सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून अट्टल गुन्हेगार ज्ञानोबा बालाजी जाधव (रा. रूपचंद नागर तांडा, जि. लातूर) याने पलायन केले. त्याच्या शोधासाठी बीड पोलिसांची पथके रवाना झाली असली तरी या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
१५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा कारागृहातून ज्ञानोबाने भिंतीवरून उडी मारत पलायनाचा प्रयत्न केला होता; परंतु उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारल्याने त्याचे दोन्ही पाय मोडले होते. त्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. पुन्हा २४ मार्च रोजी शौचास जाण्याचा बहाणा करीत तो शौचालयात गेला व खिडकीतील काचाने स्वत:चा गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यातून बचावल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये उपचार सुरू होते. त्याच्या निगराणीसाठी ए.पी. चव्हाण नामक पोलीस हवालदार नियुक्त केला होता.
सोमवारी दुपारच्या सुमारास चव्हाणही शौचास गेले होते. हीच संधी साधून ज्ञानोबाने हातकडी काढून जिल्हा रुग्णालयातून पलायन केले. हा प्रकार चव्हाण यांना परतल्यानंतर लक्षात आला. त्यांनी तात्काळ याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक (गृह) भास्कर सावंत, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब लाकाळ, एलसीबीचे सपोनि दिलीप तेजनकर, पो.उप.नि. भूषण सोनार यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली; परंतु त्यांना आरोपी शोधण्यात अपयश आले. हा प्रकार पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी तात्काळ पथके नियुक्त करुन आरोपीच्या शोधासाठी रवाना केली.
छोट्या भावाचा जामिनासाठी प्रयत्न
ज्ञानोबा हा अंबाजोगाई येथील एका चोरीच्या प्रकरणात कारागृहात होता. त्याचा जामीन मिळविण्यासाठी ज्ञानोबाचा छोटा भाऊ प्रयत्नशील होता. ३१ मार्च रोजी त्याचा जामीन होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मात्र, तत्पूर्वी ज्ञानोबाने पलायन केले.
आई आणि बहीणही जिल्हा रुग्णालयातच
ज्ञानोबाच्या आईचा अपघात झाल्याने त्या वॉर्ड क्र. ७ मध्ये उपचार घेत आहेत. त्याची छोटी बहीण आईसोबत आहे. पळून जाण्यापूर्वी आई व बहीण त्याला भेटले होते, असे सूत्रांकडून समजते.
आरोपींचे वाढते पलायन; चिंतेचा विषय
मागील काही दिवसांपासून बीड पोलिसांच्या ताब्यातून आरोपींनी पलायन करण्याचे प्रकार वाढले आहेत. धारूर ठाण्यातून ‘मोस्ट वॉन्टेड’ विलास बडे याने पलायन केले होते. त्यानंतर शिवाजीनगर ठाण्यातून एका आरोपीने पलायन केले होते. रविवारी पहाटेही कुंटणखाना चालविणारी आँटी शिवाजीनगर ठाण्यातून पळून जाण्यात यशस्वी ठरली होती. तिचा शोध लागण्यापूर्वीच पुन्हा ज्ञानोबाने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. या सर्व घटनांवरून आरोपींच्या पलायनाचे प्रकार वाढले असून, बीड पोलिसांसाठी तो चिंतेचा विषय ठरला आहे.
कर्मचा-यांच्या हलगर्जीपणा; बीड पोलिसांची बदनामी
एकीकडे बीड पोलीस गुन्हे शोधण्यात राज्यात पाचव्या क्रमांकावर आहेत; तर दुसरीकडे काही कर्मचा-यांचा हलगर्जीपणा व कामचुकारपणा खात्यासाठी घातक ठरत आहे. या एक-दोघांमुळेच संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे.