अत्याचारानंतर अल्पवयीन गतिमंद मुलगी गर्भवती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 06:30 AM2024-03-25T06:30:19+5:302024-03-25T06:31:59+5:30
पीडितेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून पुणे पोलिसांनी झीरो एफआयआर दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिसांकडे वर्ग केले.
बीड / सिरसाळा : चिंचा खाण्याचा बहाणा करून एका गतिमंद अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना परळी तालुक्यात घडली. पोट दुखत असल्यामुळे पीडितेच्या आजीने तिला पुणे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारानंतर ती गर्भवती असल्याचे उघड झाले. पीडितेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून पुणे पोलिसांनी झीरो एफआयआर दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिसांकडे वर्ग केले.
परळी तालुक्यातील एका गावामध्ये पीडित मुलगी त्यांच्या आई-वडील व आजीसह वास्तव्यास आहे. पीडितेचे आई-वडील ऊसतोडणीसाठी मागील सहा महिन्यांपासून कर्नाटक राज्यात गेले आहेत. पीडित मुलगी गतिमंद आहे, तर घरातील एका वृद्ध महिलेस दिसत नाही म्हणून त्या दोघी घरीच असतात. दरम्यान, त्यांच्या घरातील महिला सदस्य उषा (नाव बदलले आहे) ऊसतोडीला गेल्या असल्याने पीडिता व तिची आजी असे दोघेच घरी होत्या.
ऊसतोडीवरून उषा परत आल्या असता, त्यांना पीडित मुलीचे पोट फुगलेले दिसले. त्याबाबत सासूकडे विचारणा केली असता, कावीळचे औषध दिले असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यानंतर १५ मार्च रोजी उषा यांनी पीडितेस बरे वाटावे म्हणून पुणे जिल्ह्यातील पानशेत येथे नातेवाइकाकडे घेऊन गेल्या. दरम्यान, १८ मार्च रोजी पीडितेला अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळे पुणे येथील एका दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी तपासणी करून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले.
पीडितेला घेतले विश्वासात
महिला पोलिसांनी पीडितेला विश्वासात घेत विचारणा केली असता, तिने सांगितले की, उषा या ऊसतोडीला गेल्या असता, गावातील एका व्यक्तीच्या घरी जात होते. त्या ठिकाणी राहुल नामक एक व्यक्ती येत होता. तू मला फार आवडतेस, असे म्हणायचा. परंतु मी त्याला काहीही बोलत नव्हते. कधी-कधी राहुल हा कोपीमध्ये यायचा व अंगाला हात लावायचा. एक दिवस राहुल कोपीमध्ये आला, मला चिंच खायला दिली व त्यानंतर माझ्यावर अत्याचार केला. घाबरलेले असल्याने कोणालाही काही सांगितले नाही.
पोलिसांनी सर्व प्रकार ऐकल्यानंतर उषा यांच्या फिर्यादीवरून राहुल (नाव पूर्ण नाही) याच्याविरुद्ध पुणे येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुस्कान फाउंडेशनच्या समुपदेशक पूनम गायकवाड यांनी पीडितेस सहकार्य केले. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून सिरसाळा पोलिसात वर्ग केला आहे.